मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (७६) यांचे शनिवारी मध्यरात्री १२.0१ वाजता मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यावर गेल्या बारा दिवसांपासून उपचार सुरू होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत होती. श्वसनाच्या त्रासामुळे शनिवारी सकाळपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. बॉम्बे हॉस्पिटलमधील एक वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. आदिक यांना व्हेटींलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. गोविंदराव आदिक यांनी आमदार, खासदार, मंत्री तसेच काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून कामाचा ठसा उमटवला होता. शनिवारी प्रकृती चिंताजनक बनल्याने शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बॉम्बे हॉस्पिटलकडे धाव घेऊन आदिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शनिवारी मध्यरात्री आदिक यांचे निधन झाल्याचे अधिकृत वृत्त त्यांचे चिरंजीव अविनाश आदिक यांनी दिले. आदिक यांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. आदिक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात महत्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला होता. आज अंत्यसंस्काररविवारी सायं. ४ वाजता श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी श्रीरामपूर त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे.
गोविंदराव आदिक यांचे निधन
By admin | Updated: June 7, 2015 03:45 IST