मुंबई : राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये सायंकाळी ६ ते ९ या प्राइम टाइममध्ये मराठी सिनेमा दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी भूमिका घेणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या मुद्द्यावर अक्षरश: ‘यू टर्न’ घेतला. आता मराठी चित्रपट निर्माते सांगतील त्यानुसार दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत मराठी सिनेमा दाखविला जाईल, असा नवा तोडगा निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील अनेक पडदे असलेल्या (मल्टिप्लेक्स) सिनेमागृहांमध्ये संध्याकाळी ६ ते रात्री ९ या प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा मंत्री तावडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर बॉलिवूडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेक हिंदी तारेतारकांनी व निर्मात्यांनी त्यास विरोध दर्शविला. प्रख्यात स्तंभलेखिका शोभा डे यांनी तर या निर्णयाची अक्षरश: खिल्ली उडविली. त्यामुळे या निर्णयाची पुरती ‘शोभा’ होणार असे दिसत होते. यासंदर्भात तावडे यांच्या दालनात निर्माते, वितरक आणि चित्रपटगृहांचे मालक यांची बैठक झाली. या बैठकीला आयनॉक्सचे सिद्धार्थ जैन, सिटी प्राईडचे अरविंद चापळकर, पीव्हीआरचे कमल ग्यानचंदानी, निर्माते महेश कोठारे, नितीन चंद्रकांत देसाई, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर आदी उपस्थित होते. तावडे यांनी सांगितले की, सायंकाळी ६ ते रात्री ९ म्हणजे प्राइम टाइम ही शासनाची भूमिका होती; परंतु निर्मात्यांनी आग्रह धरला की, सिनेमाच्यानुसार प्रेक्षकवर्ग बदलतो. युवकांवर सिनेमा असेल, तर त्याचा प्राइम टाइम दुपारी १२ ते ३ असा असतो. महिलाप्रधान सिनेमाला दुपारी ३ ते ६ या वेळेत जास्त प्रेक्षकवर्ग मिळतो आणि कौटुंबिक सिनेमासाठी सायंकाळी ६ ते ९ ही वेळ महत्त्वाची असते. निमार्त्यांची ही भूमिका मल्टिप्लेक्स मालकांनी मान्य केली. (विशेष प्रतिनिधी)
प्राइम टाइमवरून सरकारचे घूमजाव!
By admin | Updated: April 10, 2015 05:07 IST