ऑनलाइन लोकमत,सोलापूर, दि. 17 - राज्यातील सहकारी सोसायट्या सक्षम करण्यासाठी सचिवांना वाढीव स्वरुपात सरकारी मानधन देण्याची तरतूद करण्यात येईल. मात्र ७/१२ धारक शेतकऱ्यांना सोसायटीचे सदस्यत्व देण्याबाबत आता माघार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना स्थानिक सोसायटीत सदस्यत्व आणि त्यांना कर्ज वाटप करण्याबाबत आपण आग्रही असल्याचे सुभाष देशमुख यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा निर्णय नवीन नाही. तो जुनाच कायदा आहे. फक्त मी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कदाचित विरोध होईल. गाडी रुळ बदलताना थोडासा खडखडाट होतो. तसा प्रकार सहकार क्षेत्रात होईलही. नवीन बाबी स्वीकारताना मला त्रास होणार, याची कल्पना आहे. त्याकडे मी लक्ष देणार नाही. सोसायट्यांच्या सचिवांसह सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये त्याचे चांगले परिणाम दिसतील. सचिवांना मिळणारे वेतन खूपच अपुरे आहे. त्यात शासकीय मानधनाची वाढीव तरतूद करण्याचा मानस आहे. त्याशिवाय सोसायट्या सक्षम होणार नाहीत, असे मतही त्यांनी मांडले. ...तरच बरखास्तीची कारवाई !सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीच्या संचालक मंडळाला कलम ४५ (अ) अन्वये पणन खात्याने बरखास्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. याकडे लक्ष वेधले असता सहकार मंत्री देशमुख म्हणाले, नोटिशीत तथ्य असेल तर कारवाई होईल. अन्यथा कारवाईचा प्रश्न येतोच कुठे, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक लढवणारच !सोलापूर बाजार समितीची गतवेळची निवडणूक मी लढलो होतो. आता तर मी या खात्याचा मंत्री आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढवणारच असा पुनरुच्चार सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. शहरात दोन आठवडी बाजारफळे व भाजीपाला विक्रीसाठी सोलापुरात होम मैदान आणि विजापूर रोडवरील आरटीओ कार्यालय शेजारील मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणी शनिवारी आणि रविवारी आठवडी बाजार भरवला जाणार आहे. शहराच्या विविध भागातही जागांचा शोध सुरु आहे. जागा उपलब्ध होतील तिथे आठवडी बाजार भरवू. मात्र शीतगृहांची व्यवस्था करण्यास आणखी वेळ लागेल. विधानभवनासमोर नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. त्याला शेतकरी आणि ग्राहक यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
सोसायटी सचिवांना सरकारी वाढीव मानधन - सहकारमंत्री
By admin | Updated: August 17, 2016 20:13 IST