मंचर : बैलगाडा शर्यतींवरील बंदी दूर करून त्या त्वरित सुरू कराव्यात, असे निवेदन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. शर्यत सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकार बैलगाडा मालकांसोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, त्यांची भेट भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली. या वेळी बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटावी, अशी मागणी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रविजी अनासपुरे, पांडुरंग ठाकूर, भगवान शेळके, अॅड धर्मेंद्र खांडरे, शरद बुट्टे-पाटील, अतुल देशमुख, संजय थोरात, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, डॉ. हरीष्श खामकर, मारुती भवारी, कैलास राजगुरव, बाबू थोरात, नवनाथ थोरात, गणेश बाणखेले आदी उपस्थित होते.बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले असून, परंपरेनुसार सुरू असलेल्या यात्रा बंद पडल्याने उत्साह मावळला आहे. या शर्यती त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. जयसिंग एंरडे म्हणाले, की बैलगाडा शर्यतींना शेकडो वर्षांची परंपरा आहे. शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरी, तसेच बैलगाडा मालक नाराज झाले आहेत.बैलगाडा शर्यती सुरू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून, बैलगाडा मालकांसोबत आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने दोन विधिज्ञ दिले असून, ते बैलगाडा मालकांची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. बैलगाडा मालकांबरोबर चर्चा करायची आहे. चार बैलगाडामालकांना चर्चेसाठी आणण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. जर निकाल विरुद्ध गेला, तरी संसदेत यासंदर्भातील कायदा करण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर)
सरकार बैलगाडामालकांसोबत : मुख्यमंत्री
By admin | Updated: September 19, 2016 01:13 IST