मुंबई : हवाई छायाचित्रणाची मुहूर्तमेढ रोवणारे, हुशार, अभ्यासू, शिस्तबद्ध छायाचित्रकार आणि माणसांचा संग्रह करण्याची कला अवगत असलेले गोपाळ बोधे यांची काम करत असताना एक्झिट झाली. यामुळे त्यांची अनेक स्वप्ने अपुरी राहिली आहेत. या स्वप्नांना मूर्तरूप दिल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दांत मान्यवरांनी बोधे यांना श्रद्धांजली वाहिली. गोपाळ बोधे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे शनिवारी शोकसभा झाली. या वेळी येथे अनेक मान्यवर उपस्थित होते. हवाई छायाचित्रणातील अद्वितीय फोटोग्राफर, परदेशात असते तर अब्जावधी कमावले असते. सर्वसामान्य माणसाने हेलिकॉप्टरमधून इतके फोटो काढणे सहज शक्य नाही, मात्र हा चमत्कार भारताला बोधे यांनी करून दाखवला. बोधे म्हणजे छायाचित्रणाच्या बाबतीत ‘मिनी गुगल’ असल्याचे बोधे यांचे निकटवर्ती किरण ठाकूर यांनी सांगितले. अत्यंत महत्त्वाकांक्षी असा लाईटहाऊसचा प्रकल्प घेऊन जेव्हा ते आले तेव्हा त्यांची संकल्पना आम्हाला अत्यंत आवडली. मात्र प्रत्यक्षात ती कशी उतरणार याबबात आम्ही साशंक होतो. हा प्रकल्प पूर्ण करण्याची किमया बोधे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेने सहजसाध्य केली. त्यांचा स्नेह मला १० वर्ष मिळाला. अजूनही तो आहे, या सभेचंही तो हवाई छायाचित्र काढत असेल असे वाटतेय, असे भावनिक उद्गार अॅडमिरल चावला यांनी काढले. छोट्या छोट्या गोष्टी पाहण्याची दृष्टी, पुस्तके काढण्याचा एक झपाटा, छायाचित्रणाचा अभ्यास अशा शब्दात सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी बोधे यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक अनुभव ते स्वत: जगल्याचे विभास आमोणकर यांनी सांगितले. वडिलांनतरही सिद्धी शक्ती प्रकाशानाचे काम असेच सुरू राहील आणि बोधे यांची अर्धवट राहिलेली कामेही पूर्ण केली जातील, असे बोधे यांचा मुलगा कौस्तुभ बोधे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
गोपाळ बोधेंना श्रद्धांजली वाहताना मान्यवर भावूक
By admin | Updated: May 25, 2014 05:29 IST