शिर्डी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये भाजपशी युती तोडण्याचा शिवसेनेचा सूर दिसून येतो. मात्र, स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सरकारमधील युती तोडून दाखवावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिले. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाढती संख्या पाहता डिसेंबरच्या अधिवेशनात सरकारने तातडीने कर्जमाफी योजना जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांचे शाप घेऊन महाराष्ट्र बदलणार नाही. खेडी उद्धवस्त करून स्मार्ट सिटी होणार नाहीत, शेतकऱ्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी केल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. सरकारने हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची योजना आणल्यास आम्ही पाठिंबा देऊ, कर्जमाफी जाहीर केली नाही तर, सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी द्या - विखे-पाटील
By admin | Updated: October 21, 2016 01:37 IST