ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मूकबधीर मुलांच्या कार्यक्रमात कमरेत पिस्तूल खोचून भाषण केल्याचा मुद्दा सोमवारी विधान सभेतही चांगलाच गाजला. मंत्र्यांनी शाळेत पिस्तूल नेल्याने मुलांवर काय परिणाम झाला असेल, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळा अशी मागणी अजित पवार यांनी केली. तर महाजन यांच्याकडे २० वर्षांपासून पिस्तूलीचा परवाना असून त्यांनी पिस्तूल बाळगण्यात गैर काहीच नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांचा बचाव केला.
रविवारी जळगावमध्ये मूकबधीर मुलांसाठीच्या साहित्य वाटप कार्यक्रमात जलंसपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कमरेत पिस्तूल खोचून भाषण दिले होते. मंत्र्यांनी लहानमुलांसमोर पिस्तूल बाळगल्याने अनेकांनी याप्रकारावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. महाराष्ट्राला बिहारच्या वाटेवर नेले जात आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला. राज्याचे मंत्र्यांना पोलिसांवर विश्वास नाही का, राज्याची कायदा व सुव्यवस्था ऐवढी ढासळली की मंत्र्यांना पिस्तूल घेऊन फिरावं लागतंय असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. महाजन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर सभागृहात निवेदन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीने लावून धरली.
विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाष्य केले. फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन यांच्याकडे गेल्या २० वर्षांपासून पिस्तूलीचा परवाना आहे. वैयक्तिक पिस्तूल परवानाधारकाने त्याची पिस्तूल सदैव त्याच्यासोबत बाळगणे बंधनकारक असते. त्यामुळे महाजन यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाजन यांच्या पिस्तूलीचा काही भाग अनावधानाने दिसला व यासाठी त्यांना योग्य त्या सुचना देऊ असे आश्वासनही त्यांनी सभागृहाला दिले.