शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

गंगाधर गाडगीळांच्या ‘कबुतरे’ची गाेष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 11:05 IST

जे लेखक भविष्यात नावारूपाला येतील याची कसलीही कल्पना नसताना अशा लेखकांची पुस्तकं निवडून प्रकाशित करणारे, अनेक नामवंतांचे पहिले पुस्तक छापणारे पाॅप्युलरचे प्रमुख रामदास भटकळ सांगणार आहेत पुस्तकाच्या जन्माची गोष्ट. 

- रामदास भटकळ

गंगाधर गाडगीळ यांचा पहिला कथासंग्रह ‘मानसचित्रे’. यात त्यांच्या पृथगात्मकतेची झलक फारशी दिसत नाही. त्यांचा दुसरा संग्रह ‘कडू आणि गोड’ हा मात्र त्यांच्या कथांना नवकथा का म्हणतात याच्या स्पष्ट खुणा दाखवत होता. त्याला बा. सी. मर्ढेकर यांची प्रस्तावना होती. तरी स्वतःच्या लेखनाची बलस्थाने कोणती, याची कल्पना स्वतः लेखकाला झालेली नसावी. त्यांनी त्यानंतरचे दोन कथासंग्रह वेगळ्या प्रकारे प्रसिद्ध होऊ दिले. त्या काळात पुस्तकांच्या किमती दोन अडीच रुपये असायच्या. त्यामुळे लग्नात भेट द्यायला अशी पुस्तके सोयीची व्हायची.

 माझ्या वडिलांनी १९४८ मध्ये गिरगावातील बॉम्बे बुक डेपो विकत घेतला होता. त्याचे व्यवस्थापक पांडुरंग कुमठा, ग.ल.भट यांनी त्या दुकानाला मराठी वळण दिले होते. या बाजारी यशाची शक्यता लक्षात घेऊन गाडगीळांच्या दोन कथासंग्रहांचे आणि एका एकांकिका संग्रहाचे प्रकाशन करण्यासंबंधी करारपत्र केले होते. पहिला कथासंग्रह त्यांच्या गंभीर कथांचा, तर दुसरा विनोदी कथांचा संग्रह. या सुमारास मी मिसरूड फुटून पायजमा झग्यात मिरवत होतो. सानेगुरुजी, वि.स. खांडेकर, ना. सी. फडके, नाथमाधव यांच्या प्रभावाखालून हळूहळू निसटत होतो. भालचंद्र देसाई हा एल्फिन्स्टन कॉलेजातील माझ्याहून तीन चार वर्षांनी ज्येष्ठ असा हुशार तरुण आमच्या जवळच राहत होता. त्याने विद्यार्थीदशेतच मर्ढेकरांच्या कवितेवर लिहिलेला लेख ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाला होता. आमच्या गप्पांतून देसाईने नवसाहित्यावर माझे बौद्धिक घेतल्याने नवसाहित्याचे अध्वर्यू गंगाधर गाडगीळ आणि बा.सी.मर्ढेकर यांच्या लेखनाकडे मी हास्यास्पदतेपासून कौतुकापर्यंत मजल मारली होती.

 मी सोळा-सतरा वर्षांचा असूनही त्या सरंजामी वातावरणात मालकाचा मुलगा आणि कुमठांचा, लहान का होईना, मेहुणा म्हणून विशेष मान होता. गाडगीळांच्या कथांची कात्रणे मला दाखवण्यात आली. त्यांची निवड, संकल्पित ‘ओळख’ हे शीर्षक आणि लग्नसराईत योग्य असे देखण्या मुलीचे, रघुवीर मुळगावकरी रंगीत चित्र ही योजना ठरवण्यात आली होती. या हेतूशी विसंगत अशा ‘बिनचेहऱ्याची संध्याकाळ’, ‘मृत्यूचे संजीवन’ यांसारख्या उत्तम कथा बाजूला ठेवल्या होत्या. मी ओळखू लागलेले नवकथाकार गाडगीळ हे नव्हते. मी हळूहळू या संकल्पित पुस्तकाचा ताबा घेतला. बुजत का होईना, मी गाडगीळ यांच्याशी कथांच्या निवडीबद्दल बोलू लागलो. कदाचित त्यांच्या लक्षात गेले असेल की या मुलाला नवकथेची बलस्थाने लक्षात आली आहेत. तेव्हा गाडगीळ हे प्राध्यापक, तर मी एक विद्यार्थी; तरीही ते मला मित्रासारखे वागवत असत. चर्चा करताना मी माझी मते मोकळेपणे मांडू लागलो. ते रागावले तर नाहीतच. उलट त्यांना प्रकाशकाने असा साहित्यचर्चेत रस दाखवणे याचे कौतुक वाटताना जाणवले. त्यांच्या घरी ते काही बुजुर्ग साहित्यिकांना बोलावून पुस्तकांवर चर्चा ठेवत. माझ्या अननुभवाकडे दुर्लक्ष करून ते मला बोलवत असत. एकदा तर ते मला चित्रपट दाखवायला घेऊन गेले. अशाने माझा आत्मविश्वास बळावू लागला. 

मी सुचवलेले ‘कबुतरे’ हे कथासंग्रहाचे शीर्षक कोणालाही पटले नसते. तरी हट्टाने मी कथांची निवड आणि शीर्षक यांचा आग्रह धरला. मला चित्रकार दीनानाथ दलाल यांची चित्रे आवडत. त्यांच्याकडे ही कात्रणे घेऊन गेलो. काही प्रकाशक फिजिक्सवरील क्रमिक पुस्तकांचे कव्हरही देखण्या तरुणीच्या चित्राने सुशोभित करून घेत. मी दलाल यांना योग्य वाटेल तसे चित्र काढायची विनंती केली. पुस्तकाच्या वेगळेपणाकडे लक्ष जावे म्हणून लेखकाच्या सल्ल्याने प्राध्यापक वा.ल. कुळकर्णी यांच्याकडून प्रस्तावना लेख लिहून घेतला. माझ्या अतिउत्साहामुळे तो गहाळ झाला. तरी ‘कबुतरे’ पुस्तकाच्या प्रकाशनामुळे खरे नवकथाकार गाडगीळ वाचकांच्या मनात भरले असे मला वाटते.

नवखेपणाच्या उत्साहाने मी त्या पुस्तकाच्या प्रती भराभर अभिप्रायार्थ पाठवल्या. आज सत्तर वर्षांनंतर कोणी काय लिहिले हा तपशील आठवत नाही; पण तेव्हापासून गंगाधर गाडगीळ हे नवकथेचे प्रमुख शिलेदार ठरू लागले.  या पुस्तकाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना जे ओळखू लागलो त्याचा दीर्घकालीन परिणाम झाला. १९५२ ते २००८ अशा दीर्घ काळात चढउतार आले तरी त्यांची ‘पॉप्युलर’शी जवळीक वाढत गेली. वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीच्या वतीने पुरस्कार योजना आम्ही चालवली. त्या दोघांच्याही मृत्यूनंतर गाडगीळ यांच्या वारसांनी त्यांच्या सर्व लेखनाचे स्वामित्व अधिकार आमच्याकडे सोपवले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र