पुणे : मित्राच्या वडिलांचा अंत्यविधी उरकून वैकुंठ स्मशानभूमीमधून बाहेर पडलेल्या कुख्यात नीलेश घायवळ टोळीच्या तीन सराईत गुंडांवर मारणे टोळीने भरदिवसा गोळीबार केला. दुचाकीवरून जात असताना या तिघांना मोटारीने धडक देऊन खाली पाडल्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या. स्मशानभूमीबाहेर असलेल्या परमार्थ निकेतन मंदिरामध्ये सत्संग सुरू असतानाच ही घटना घडली. पप्पू गावडेचा खून केल्यानंतर घायवळ टोळीवर दुसरा हल्ला करून मारणे टोळीने घायवळला दुसरा धक्का दिला आहे. या हल्ल्यात एका गुंडाचा मृत्यू झाला आहे.अमोल हरी बधे, संतोष नागू कांबळे आणि लखन लोखंडे अशी जखमींची नावे आहेत. गजा मारणे टोळीच्या आठ गुंडांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बधे याचा मृत्यू झाला असून, तो घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य होता. मित्र विशाल पडवळ याचे वडील विठ्ठल पडवळ यांच्या अंत्ययात्रेला हे तिघे आले होते. याची कुणकुण मारणे टोळीच्या गुंडांना लागली होती. वैकुंठ स्मशानभूमीबाहेर ते दबा धरून बसलेले होते. वैकुंठाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या थोड्या अंतरावर एक मोटार उभी करण्यात आली होती. तर पाठीमागील बाजूला दुचाकी लावण्यात आलेल्या होत्या. बधे, कांबळे आणि लोखंडे हे तिघेही मोटारसायकलवरून बाहेर पडल्यानंतर राजेंद्रनगरच्या दिशेने निघाले होते. परमार्थ निकेतनसमोरच मोटार आडवी घालून त्यांना खाली पाडण्यात आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांवर हल्ला करण्यात आला. जिवाच्या आकांताने उलट्या दिशेने पळत सुटलेल्या या तिघांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी अडवले. पिस्तूलमधून बेछूट गोळीबार करण्यात आला. (प्रतिनिधी)
पुण्यात टोळीयुद्ध भडकले
By admin | Updated: December 1, 2014 01:55 IST