गजराज मथुरेकडे रवाना!

By admin | Published: June 15, 2017 12:31 AM2017-06-15T00:31:12+5:302017-06-15T00:31:12+5:30

गेली अनेक दशके जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या औंध संस्थानचा गजराज ऊर्फ मोती हत्ती अखेर बुधवारी मथुरेकडे गेला. तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर

Gajraj going to Mathura! | गजराज मथुरेकडे रवाना!

गजराज मथुरेकडे रवाना!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

औंध (जि. सातारा) : गेली अनेक दशके जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या औंध संस्थानचा गजराज ऊर्फ मोती हत्ती अखेर बुधवारी मथुरेकडे गेला. तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर काहिशा अनिच्छेनेच जड पावलांनी हत्ती ट्रकमध्ये बसला आणि औंधवासीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला.
प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेतर्फे गजराजाला नेण्यासाठी मथुरा येथील एलिफंट केअर सेंटरची सर्व यंत्रणा सकाळी औंधमध्ये दाखल झाली. मात्र, हत्तीच्या हट्टामुळे तब्बल दहा तासांनंतर त्याला घेऊन जाणाऱ्या टीमने औंध सोडले. वन खाते, महसूल व पोलीस प्रशासन सकाळी सात वाजता औंधमध्ये हजर झाले होते. हत्तीला नेणार असल्याचे समजताच ग्रामस्थ, अबालवृद्ध यांच्यासह महिलांनी मोठ्या प्रमाणावर राजवाडा परिसरात गर्दी केली. औंध ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करत प्रशासनाने संपूर्ण गावातून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी हत्तीची मिरवणूक काढली. ही निरोपाची मिरवणूक असल्याने महिला अक्षरश: धाय मोकलून रडत होत्या. अधिकारीही भावनाविवश झाले होते.
हत्तीला नेण्यासाठी आलेली मथुरा केअर सेंटरची गाडी औंधपासून दीड कि.मी. अंतरावर थांबविण्यात आली होती. हत्ती सकाळी साडेअकराला तिथे जाण्यासाठी आला खरा पण; तब्बल तीन तास झाले तरी तो गाडीत चढलाच नाही. त्यामुळे सकाळी सातपासून प्रशासन अक्षरश: हतबल झाले होते. एरवी हत्ती कोठेही जाताना काही मिनिटांतच गाडीत बसत होता. परंतु निरोपाच्या वेळी माहुतसह सर्वांनीच हात टेकले. त्यानंतर त्याला सरकारी मळयात नेले परंतु तेथेही तो गाडीत बसत नाही म्हटल्यावर मोकळ्या ट्रकमध्ये बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्ती त्या ट्रकमध्ये बसताच प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

हत्तीकडून श्री यमाई देवीला सलामी !
हत्ती ग्रामनिवासींनी मंदिराजवळ आल्यानंतर त्याने आपल्या सोंडेने श्री यमाई देवीस सलामी देताच उपस्थित औंधकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर गजराजने राजवाड्यात जावून सलामी दिली.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या लग्नाच्या वराती या मोती हत्तीवरुनच निघाल्या आहेत. परिसरातील यात्रा, जत्रांसह अनेक विजयी मिरवणुकाही याच गजराच्या साक्षीने निघाल्या आहेत.

Web Title: Gajraj going to Mathura!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.