- संदीप प्रधान, मुंबईमहाराष्ट्राला स्वच्छता आणि पुरोगामी विचाराचे देणे देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मनावर गारूड केले आहे. गाडगेबाबांवर तेलगु भाषेत पुस्तकाचे लेखन राव यांनी सुरु केले असून त्यांचे तीन पुतळे तयार करून घेण्याचे राज्यपालांनी ठरवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियानह्ण सुरु केल्यानंतर अमरावती येथील विद्यापीठास भेट दिली असता राव यांना गाडगेबाबांचे इंग्रजी चरित्र त्यांना भेट देण्यात आले. त्याचे वाचन केल्यावर राज्यपाल राव यांच्यावर गाडगेबाबांचा स्वच्छतेचा ध्यास, त्यांचे अंधश्रद्धा विरोधी काम याने गारूड केले. गाडगेबाबांशी संबंधित वेगवेगळे संदर्भ गोळा करून राज्यपालांनी तेलगु भाषेत चरित्र लिहिण्यास सुरुवात केली आहे. गाडगेबाबांचा मुंबईत कुठे पुतळा आहे का, याचा शोध राज्यपालांनी घेतला असता असा पुतळा नसल्याचे त्यांना समजले. फार पूर्वी मुंबईतील धोबीतलाव येथे गाडगेबाबांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र त्यानंतर एक दिवस तो अचानक गायब झाला, अशी माहिती मिळाली. सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या पुरोगामी व्यक्तीचा पुतळा तयार करवून बसवण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी मुंबईतील व तेलंगणातील अशा दोन शिल्पकारांना राजभवनावर बोलावून गाडगेबाबांचे तीन पुतळे तयार करून घेण्याबाबत चर्चा केली. हे तीन पुतळे कुठे बसवायचे याबाबत राज्यपालांनी अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. राज्यपाल राव यांचे ‘उनिकी’ (अस्तित्व) हे पुस्तक यापूर्वी प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये तेलंगणाचे आंदोलन, लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘माय कंट्री माय लाईफ’ चरित्रग्रंथाची समीक्षा अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे.
राज्यपालांवर गाडगेबाबांचे गारुड
By admin | Updated: August 15, 2015 00:24 IST