ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 15 - धानोरा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस जवानाने सहकारी पोलिस महिलेच्या घरी स्वत:वर बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. कन्हैय्या नैताम रा. मुरखळा असे त्या पोलिस शिपायाचे नाव आहे. सहकारी पोलिस महिलेसोबतच्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास आरंभला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैय्या नैताम हे मुरखळा येथील रहिवासी आहेत. त्यांना पत्नी व दोन मुले आहेत. कन्हैय्या हे धानोरा पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याने ते स्थानिक पोलिस संकुलात वास्तव्यास आहेत. तर त्यांचे कुटूंब गडचिरोलीत राहतात.
नैताम यांच्यासोबत धानोरा पोलिस ठाण्यात एक महिला शिपाई कार्र्यरत आहे. ही महिला पतीपासून विभक्त झाली असून ती आपल्या लहान मुलीसोबत येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे.
याच घरात आज सकाळी नऊ वाजता कन्हैय्याने स्वत:वर बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केली. या दोघांमधील पे्रम प्रकरणात तणाव निर्माण झाल्याने कन्हैय्याने हा टोकाचा निर्णय घेतला, अशी चर्चा सध्या पोलिस दलात व धानोरात सुरू आहे. पोलिस त्यादिशेने तपास करीत आहेत. घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.