श्रीनारायण तिवारी, मुंबईमहाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील परवानाधारक औषधांच्या दुकानांत आता स्वाईन फ्लूवरील औषध मिळेल. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) खासगी रुग्णालयांतील औषध दुकानांना ‘आॅन डिमांड’ ‘शेड्यूल एक्स’ श्रेणीचा परवाना देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सर्व भागांत स्वाईन फ्लूवरील औषधे आता उपलब्ध होतील.राज्यातील विविध भागांतून स्वाईन फ्लूवरील औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतीच आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक बोलावून राज्यात तातडीने औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. खासगी रुग्णालयांना जोडलेल्या औषध दुकानांना शेड्यूल एक्स श्रेणीतील औषधे ठेवण्याची परवानगी नाही, त्यामुळे ते स्वाईन फ्लूवरील औषधे ठेवू शकत नाहीत. नव्या निर्णयामुळे त्यांना शेड्यूल एक्स औषधांचा परवाना मिळू शकतो व ते औषधे ठेवू शकतात, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.शेड्यूल एक्स श्रेणीत मोडणाऱ्या औषधांच्या विक्रीसाठी खूपच कडक नियम आहेत. त्यातील बहुतेक औषधांचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याने त्यांच्या विक्रीवर सरकारने बंधने घातली होती. त्यानंतर ही औषधे नोंदणीकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय विकण्यास बंदी होती. एवढेच नव्हे तर संबंधित डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची प्रत औषधाच्या दुकानदाराने स्वत:कडे ठेवून घ्यावी लागत होती. गरज भासल्यास ही प्रत अन्न आणि औषध प्रशासनाला दाखवावी लागत असे. मात्र नव्या निर्णयानुसार हा परवाना त्या रुग्णालयांना कोणत्याही कटकटीशिवाय मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीपासूनच शेड्यूल एक्स श्रेणीतील औषधांचे परवाने उपलब्ध आहेत. स्वाईन फ्लूची औषधे शेड्यूल एक्स परवानाधारक सर्व औषधांच्या दुकानदारांकडे उपलब्ध आहेत. त्यावरून स्वाईन फ्लूच्या औषधांची टंचाई आहे, असे समजणे चूक ठरेल, असेही डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.
स्वाइन फ्लूवरील औषधे मिळण्याचा मार्ग मोकळा
By admin | Updated: February 23, 2015 02:30 IST