आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: April 25, 2016 04:50 AM2016-04-25T04:50:22+5:302016-04-25T04:50:22+5:30
वाहतूक पोलीस कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन एकाला अटक करण्यात आली आहे.
परतवाडा : वाहतूक पोलीस कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी आ. कडू यांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी सायंकाळी आ. कडू खासगी वाहनाने परतवाडा शहरातील पी.के.व्ही. कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जात असताना स्थानिक बसस्थानकापुढे त्यांना खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या दिसल्या. त्यामुळे कडू गाडी खाली उतरले व आपणास अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, असे वाहतूक कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
>बच्चू कडू यांची तक्रार
यासंदर्भात रविवारी आ. बच्चू कडू यांनी परतवाडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांनी शनिवारी सायंकाळी आपण आयोजित बैठकीला जात असताना बसस्थानकाजवळ खासगी ट्रॅव्हल्स, काळी-पिवळी, अॅटो आदी वाहने उभी होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत इंद्रजीत चौधरी या वाहतूक कर्मचाऱ्यास विचारणा केली असता त्यांनी असभ्य भाषेत वाद घालत अंगावर येण्याचा प्रयत्न करून अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.