ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. खोब्रागडे यांना मुंबईतून विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
प्रशासकीय सेवेत असताना राजकारण्यांशी संघर्ष करणारे उत्तम खोब्रागडे यांना निवृत्तीनंतर राजकारणाचे वेध लागले होते. खोब्रागडे कोणत्या पक्षात जाणार याविषयी सर्वांनाच कमालीची उत्सुकता होती. मंगळवारी उत्तम खोब्रागडे यांनी रामदास आठवलेंच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. दलितांच्या विकासासाठी रिपाईचा हाच योग्य पर्याय असल्याने या पक्षात प्रवेश केल्याचे खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खोब्रागडे यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, बेस्टचे महाव्यवस्थापक, आदिवासी खात्याचे प्रधान सचिव अशा पदांवर काम केले असून आदर्श घोटाळ्यात त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती.