मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना नीट मिळतो की नाही, यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांची फौज नजर ठेवणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठीची एक योजना तयार केली आहे. दानवे यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की, या १४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, हे आमचे कार्यकर्ते बघतील़ कुठे उणिवा दिसल्या तर सरकारच्या लगेच नजरेस आणून देतील. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पक्षाच्या दुष्काळ समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांचा एकमेकांशी समन्वय असेल. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये पक्षाकडून एक गाव निवडले जाईल आणि तेथे पक्षाच्या खर्चातून उपाययोजना करण्यात येणार आहेत. या गावांमध्ये किमान एक उल्लेखनीय अशी उपाययोजना पक्षाच्या वतीने केली जाईल. यासाठी चिंतन शिबिरे सुरू असून या ठिकाणी मिळालेली माहिती इतर कार्यकर्ते आणि सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम पक्ष पदाधिकारी/लोकप्रतिनिधी करतील, अशी माहिती दानवेंंनी दिली. पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे. सरकार आणि पक्षात समन्वय आहेच. त्यासाठी स्थापन केलेल्या भाजपाच्या कोअर कमिटीची दर १५ दिवसांनी बैठक होते, पण खाली थेट गावापर्यंत हा समन्वय राहावा यासाठी नवीन यंत्रणा उपयोगी ठरेल, असे दानवे म्हणाले. सरकार आणि भाजपात समन्वयाचा अभाव असल्याची भावना असताना समन्वयाचा दानवे पॅटर्न येऊ घातला आहे. (विशेष प्रतिनिधी)
सरकारच्या कारभारावर लक्ष
By admin | Updated: September 24, 2015 02:15 IST