मुंबई- कांदिवली पश्चिम परिसरात बुधवारी एका प्लास्टिकच्या कारखान्याला अचानक आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. कांदिवली पश्चिम परिसरात अनमोल टॉय नावाचा प्लास्टिकची खेळणी बनविण्याचा कारखाना आहे. हा कारखाना अनधिकृत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बुधवारी दुपारी अचानक या कारखान्याच्या चार गळ्यांमध्ये आग लागली. ज्यामुळे जळणाऱ्या प्लास्टिकचा विषारी काळा धूर सर्वत्र पसरू लागला. या धुरामुळे घुसमटलेल्या आजूबाजूच्या घरातील लोकांनी घरातून बाहेर पडण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या या ठिकाणी पाचारण करण्यात आल्या. ज्यामुळे काही वेळातच ही आग नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत काही प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. कांदिवली पोलीस आणि पालिकेच्या आर दक्षिण विभागात मोडणाऱ्या या अनधिकृत कारखान्याची अनेकदा तक्रार करूनही यावर कोणतीच कारवाई संबंधित विभागाकडून करण्यात आली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कांदिवलीत कारखान्याला आग
By admin | Updated: October 20, 2016 02:03 IST