भार्इंदर : महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवान मागील सहा वर्षांपासून पालिकेच्या अग्निशमन दलातील जवान गणवेशाविना सेवा बजावत आहे. अद्यापही त्यांच्या गणवेश खरेदीची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली नसल्याने ते गणवेशापासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.या जवानांना २००५ पासूनच अद्ययावत प्रशिक्षणच मिळालेले नाही. अग्निशमन दलात आजमितीस १०८ जवान आहेत. या सेवेत काम करण्यास इच्छुक असलेल्या नऊ शिपायांना अलिकडेच दलात भरती करण्यात आले आहे. २००२ मध्ये नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्याने पालिकेने २००४ मध्ये सुमारे ६४ फायरमनची भरती केली होती. त्या वेळी त्यांना गणवेश देण्याची प्रक्रिया प्रशासनाने पार पाडली होती. दरवर्षी जवानांना गणवेश देणे अपेक्षित असताना तो दोन वर्षानंतर दिला जात होता. परंतु, २०११ पासून जवानांना गणवेशच दिला गेला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अगोदरच योग्य प्रशिक्षणाअभावी या जवानांना कर्तव्य बजवावे लागत असताना त्यात गणवेशाविना सेवा द्यावी लागत आहे. जवानांना आगीसारख्या घटनांच्यावेळी बचावकार्यासाठी देण्यात येणाऱ्या एका फायर सूटची किंमत सुमारे ६५ ते ७० हजार इतकी आहे. याव्यतिरीक्त नियमित गणवेशाची किंमत पाच ते सहा हजार इतकी आहे. फायरसूट प्रत्येकी तीन ते चार वर्षांनी अथवा तो खराब झाल्यासच खरेदी केला जातो. गणवेश मात्र इतरवेळी आवश्यक असल्याने तो प्रत्येक वर्षाला देणे अपेक्षित आहे. यात विशिष्ट रंगांचे शर्ट, पॅण्टसह, चामड्याचे बूट, टोपी यांचा समावेश आहे. हा गणवेश २०११ पूर्वी दर दोन वर्षांनी दिला जात असला तरी त्यानंतर मात्र त्याला खो घालण्यात आल्याने दलातील जवान अद्याप त्यापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाने खरेदीसाठी अंदाजपत्रकात तरतूद केल्याचेही निदर्शनास आले आहे.
अग्निशमन जवान गणवेशापासून वंचित
By admin | Updated: April 30, 2016 03:08 IST