दुर्गापूर (जि़ चंद्रपूर) : येथील वीज केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पातील नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना कूलिंग टॉवरमध्ये सोमवारी सकाळी ९च्या दरम्यान आग लागली. यामुळे संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संच सुरू होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात ५०० मेगावॅटच्या दोन नव्या संचांचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर काम मे. बीजीआर या मुख्य कंपनीने हाईग्रीवा या कंपनीला पेटी कंत्राट दिले आहे. सोमवारी सकाळी या संचाच्या कूलिंग टॉवरमध्ये फिन्स नावाचे पॉलीमर मटेरियल लावण्याचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना अचानक आगीचे लोळ दिसले. संचाच्या अगदी शेजारी अशाच मटेरियलचा मोठ्या प्रमाणात साठा होता. आगीचे स्वरूप बघता लगेच साठा हलविण्यात आला. त्यामुळे मोठी वित्त हानी टळली. आग विझविण्यासाठी वीज केंद्रातील चार तथा महापालिकेची एक गाडी पोहोचली. त्यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आली. येथे कार्यरत कंपन्या मंदगतीने संचनिर्मितीचे काम करीत आहे. त्यामुळे संच कार्यान्वित होण्यास विलंब झाला आहे. (वार्ताहर)
चंद्रपूर वीज केंद्रात कूलिंग टॉवरला आग
By admin | Updated: February 10, 2015 02:16 IST