मुंबई : पोलिसांनी घेतलेल्या बळीचा साक्षीदार असलेले सहा कच्चे कैदी गेले कित्येक वर्षे गायब आहेत. हे सहाही साक्षीदार शोधून काढण्याचे निर्देश पोलिसांना देत, उच्च न्यायालयाने पोलीस उपमहासंचालकांना याप्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सूचवण्याचे निर्देश दिले.१९९७ मध्ये रॉबर्ट अल्मेडाच्या वृद्ध वडिलांनी रॉबर्ट दारूच्या नशेत मारझोड करत असल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात केली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रॉबर्टला अटक केली व दंडाधिकाऱ्यांपुढे सादर केले. त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. पोलिसांनी तेथे केलेल्या मारझोडीत रॉबर्टचा मृत्यू झाला. ही घटना ११ कच्च्या कैद्यांनी पाहिली. पोलिसांनी त्यांना दमदाटी करून या घटनेबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची तंबी दिली, परंतु या सर्व कच्च्या कैद्यांना रिमांडसाठी दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले, तेव्हा त्यांनी घडलेली घटना दंडाधिकाऱ्यांना सांगितली. सामाजिक कार्यकर्ते एन. आर. सोनी यांनी वृत्तपत्रांमधील बातम्यांचा आधार घेत, उच्च न्यायालयाला पत्र लिहिले. या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले. खंडपीठाने हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत अकरापैकी सहा साक्षीदार शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले. ‘त्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढा,’ असे न्यायालयाने सांगितले. (प्रतिनिधी)
‘सहा साक्षीदारांना शोधा’
By admin | Updated: August 25, 2016 06:02 IST