लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: गणेशोत्सव सण सुरू होण्याआधी मांडवा ते गेटवे जलवाहतूक सुरू होते, मात्र यंदा पावसामुळे गणेशोत्सव सुरू झाला तरी जलवाहतुकीला सुरू झाली नव्हती. या वाहतुकीला अखेर १ सप्टेंबरला मुहूर्त मिळाला आहे. पीएनपी ही एकच जलवाहतूक सोमवारपासून सुरू झाली. त्यामुळे जलवाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलवाहतूक सुरू झाल्याने पर्यटनही बहरणार आहे.
मांडवा ते गेटवे जलवाहतुकीने लाखो प्रवासी वाहतूक करीत असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जून ते ऑगस्ट असे तीन महिने जलवाहतुकीला विश्रांती असते. त्यामुळे अलिबागमध्ये येणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्गे वाहतूक करावी लागते. जलवाहतुकीमुळे अलिबागचे पर्यटन बहरते, मात्र पावसाळ्यात तीन महिने पर्यटनाला ब्रेक मिळालेला असतो. दरवर्षी गणेशोत्सव सुरू होण्याआधी एक-दोन दिवस आधी जलवाहतूक सुरू होते. त्यामुळे गणेशभक्तांना खरेदीसाठी मुंबईला जलवाहतुकीने जाणे सोपे जाते. मात्र, यंदा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्याने जलवाहतूक सुरू झाली नव्हती.
वातावरणानुसार वाढविणार फेऱ्यापावसाळी वातावरण निवळल्याने जलवाहतूक सुरू झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजता पहिली पीएनपीची प्रवासी बोट मांडवा बंदरातून गेटवेकडे गेल्याचे बंदर निरीक्षक मानकर यांनी सांगितले. सध्या एकच पीएनपी कंपनीची बोट सुरू झालेली आहे. लवकरच मालदार आणि अजंठा जलवाहतूक ही सुरू होईल. वातावरणानुसार जलवाहतुकीच्या फेऱ्या वाढल्या जातील, असे मानकर यांनी म्हटले आहे.