निखिल म्हात्रेअलिबाग : कोर्लई समुद्रात ‘बोया’चा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ९२४ मच्छीमार बोटी बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सागरी सुरक्षेवर अधिक नजर राहणार असल्याचे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी शुक्रवारी दिले.
भारतीय तटरक्षक दलाला रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्याजवळ एक संशयित बोट आढळल्याची माहिती ६ जुलैच्या मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यावेळी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी ३० हजार ५०० मच्छीमार बोटी तपासल्या असता ९२४ बेकायदेशीर बोटी असल्याचे समोर आले. यामध्ये ६३७ बोटी नोंदणीकृत असून, त्यांच्या मालकांशी संपर्क झाला नाही. तर २८७ बोटी मत्स विभागाकडे नोंदणीकृत नसल्याचे समोर आले. या बोटींची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि सहआयुक्तांना कारवाई करण्यासाठी देण्यात आल्याचे दलाल यांनी सांगितले.
सहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर ‘बोया’ सापडला; पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडलासहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या कोर्लई समुद्रात रायगड पोलिसांना ‘बोया’ सापडला. तो तटरक्षक दलाकडे देण्यात येणार आहे. या घडामोडीनंतर पोलिसांनी शोधमोहीम थांबविली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली. कोर्लई समुद्र किनारी मासेमारी बोटींना दिशादर्शक ठरणारा ‘बोया’ असल्याची माहिती मिळाली होती.
त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली होती. सहा दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा, अलिबाग, मुरूड, कोर्लई, मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलिस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध सुरू केला होता. दलाल यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यानंतर पोलिसांनी ‘बॉम्ब डिटेक्टर’च्या सहाय्याने हा ‘बोया’ शोधण्याचे काम सुरू केले होते. कोर्लई समुद्र किनाऱ्यावर अखेर तो सापडला. तो सौर ऊर्जेवर सुरू होता. तो सतत जागा बदलत असल्याने शोधमोहिमेला वेळ लागला.
नोंदणी आवश्यकसागरी सुरक्षा आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी बोटींची नोंदणी अतिशय आवश्यक आहे. मच्छीमारांच्या बाबतीत अप्रिय घटना घडल्यास त्या बोटींचा शोध घेता आला पाहिजे तसेच त्यांना मदत मिळवून देण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याकडेही दलाल यांनी लक्ष वेधले.