मुंबई - शिंदेसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी आकाशवाणी येथील आमदार निवासातील उपहारगृह कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. व्हायरल व्हिडीओ व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनून हा गुन्हा नोंदविला आहे.
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांची पोलिसांकडून चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी कुणाच्याही तक्रारीची गरज नसल्याचेही मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले. गायकवाड यांच्याविरोधात तक्रार नसल्यामुळे चौकशी करता येणार नाही, अशी भूमिका गृहराज्यमंत्र्यांनी मांडली होती. मारहाण करणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्यानंतर आणि संजय गायकवाडांना समज दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्यानंतरही गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले.
गायकवाड म्हणाले, मी कोणताही मोठा गुन्हा केला नाही. मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली. चांगल्या गोष्टीसाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आय डोन्ट केअर. कुणी जखमी नाही. गंभीर मारहाण नाही. बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय का? करप्शनचा गुन्हा आहे का? असा गुन्हा दाखल करण्याचा किंवा तक्रारीचा पोलिसांना अधिकार नाही. ३०२, ३०७ चा गुन्हा असेल, तर त्यात पोलिस फिर्यादी होऊ शकतात. माझ्या प्रकरणात कुणी तक्रारच दिली नाही. सरकार अडचणीत येण्यासारखा हा एवढा मोठा विषय आहे का? मी जे केले त्याचा मला पश्चाताप नाही, असेही ते म्हणाले.
या कलमांतर्गत गुन्हा : त्याबाबत फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर काही वेळातच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल करत, कलम ११५(२), ३५२, आणि ३(५), कलमांतर्गत गायकवाड यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.