दाभोळ : रत्नागिरी येथील बंद असलेला रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रा. लि. या वीज प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होणार असून, त्यासाठी ३५० कोटी रुपयांचा भार उचलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नैसर्गिक वायू पुरवठ्याअभावी नोव्हेंबर २०१३ पासून बंद पडलेल्या या प्रकल्पासाठी नैसर्गिक वायूची आयात, ओमान व इतर देशांतून करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेची खरेदी रेल्वे विभागाकडून ५ रुपये युनिट या दराने खरेदी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य व्हावा, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने भरीव सहाय्य केले आहे. त्यानुसार, केंद्राच्या पॉवर सीस्टिम डेव्हलपमेंट फंडातून सवलत म्हणून दोन वर्षांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाईल. राज्य शासनाने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी ३५० कोटी रुपयांचा भार विविध प्रकारे उचलला आहे. त्यानुसार, सर्व्हिस चार्जेस, विक्रीकर व वितरणातील हानी माफ करण्यात आली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दाभोळ वीज प्रकल्पाचे अखेर पुनरुज्जीवन
By admin | Updated: October 7, 2015 00:59 IST