महामार्ग पोलिसांवर ‘एसीबी’ ‘ट्रॅप’ ची भीती, अपर महासंचालकांचा ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 08:09 AM2021-06-07T08:09:43+5:302021-06-07T08:10:08+5:30
अपर पोलीस महासंचालक (महामार्ग) यांच्या कार्यालयाने शनिवारी राज्यातील सर्व महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्ॲपवर यासंबंधीचा मेसेज जारी केला आहे.
- राजेश निस्ताने
नांदेड : राज्यात महामार्ग पोलिसांवर कुठेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप होण्याची भीती अपर पोलीस महासंचालक (महामार्ग) कार्यालयाला आहे. हे ट्रॅप टाळण्यासाठी कोणत्याही वाहनधारकाचा पैशासाठी छळ करू नये, असा सल्ला महासंचालकांनी दिला आहे.
अपर पोलीस महासंचालक (महामार्ग) यांच्या कार्यालयाने शनिवारी राज्यातील सर्व महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्ॲपवर यासंबंधीचा मेसेज जारी केला आहे. महामार्ग पाेलीस अधिकाऱ्यांनी कुणालाही पैशासाठी त्रास देऊ नये, कोरोनामुळे सध्या कठीण स्थिती असल्याने वाहनधारक थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जातात.
एसीबीची कारवाई होऊ नये, यासाठी महामार्ग अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, आपल्या अधिनस्त पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना द्याव्यात, महामार्गचे वरिष्ठ पाेलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षकांनी वाहनधारकांच्या पैशासाठी होणाऱ्या छळावर नजर ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गांच्या एसपींनीही अपर महासंचालकांचा हा आदेश फॉरवर्ड करून सर्वांना अलर्ट केले आहे. राज्यात महामार्ग सुरक्षा पोलिसांचे ६३ ट्रॅप आहेत.
पैशांसाठी छळ नको
एसीबीचा ट्रॅप झाल्यास महामार्ग पोलिसांची होणारी बदनामी टाळण्यासाठीच अपर महासंचालक कार्यालयाने पैशांसाठी कुणाचाही छळ न करण्याच्या सूचना आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कुठे ना कुठे एसीबीचा ट्रॅप होतच आहे. एसीबी ट्रॅपमध्येही पोलीस यंत्रणाच अधिक अडकल्याचे चित्र आहे.