नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय ‘अवैध’ असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी करण्यात आला. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेना पक्ष वाढविला; परंतु आज वडिलांचे (बाळासाहेब ठाकरे) नाव व धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरता येत नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात हतबलता व्यक्त केली. गेल्या ८ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व या पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा निर्णय दिला. या विरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या निर्णयामुळे शिवसेना पक्षाचे राजकीय कामकाज थांबलेले आहे, असा दावाही यावेळी उच्च न्यायालयात शिवसेनेच्या वकिलांनी केला. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. संजय नरुला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.ठाकरेंचा दावा कायम सुनावणीच्या वेळी न्या. नरुला म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. हा अंतरिम आदेश केवळ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरता होता. त्यामुळे ठाकरे यांचा पक्षावरील हक्क कायम आहे. त्यावर पुन्हा मंगळवारी सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उच्च न्यायालयात विवेक सिंग, देवयानी गुप्ता व तन्वी आनंद यांनी बाजू मांडली.
वडिलांचे नाव, पक्षचिन्ह वापरता येत नाही, निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंची दिल्ली न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:32 IST