ऑनलाइन टीम
कल्याण, दि. १ - सावत्र वडिलांच्या अश्लील चाळ्यांचा पुरावा म्हणून मुलीनेच त्या घृणास्पद कृत्यांची गुप्तपणे व्हिडीयो क्लिप बनवण्याची आणि विश्वास न ठेवणा-या आईला पुरावा दिल्याची घटना कल्याणमध्ये घेडली आहे. गेली दोन वर्षे या मुलीचे सावत्र वडील तिच्याशी लैंगिक चाळे करायचे. नुकतीच अकरावीत गेलेल्या या मुलीला ५८ वर्षांचे तिचे सावत्र वडील टीव्ही बघताना सोफ्यावर बाजुला बसवायचे नी अश्लील चाळे करायचे. त्या मुलीने अनेकवेळा आईकडे तक्रार केलीदेखील. परंतु पतीच्या चांगुलपणावर विश्वास असलेल्या व त्याने कानावर हात ठेवल्याने आईने मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. परंतु अत्यंत धैर्यवान असलेल्या या मुलीने दोन वर्षांचा हा त्रास संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला. वडिलांनी नेहमीप्रमाणे दुपारी विश्रांतीसाठी घरी आल्यावर तिच्याशी केलेले चाळे त्याच्या नकळत तिने रेकॉर्ड केले.
या रेकॉर्डिंगच तिने आईला दाखवल्यावर धक्का बसलेल्या आईचा विश्वास बसला आणि तिने मुलीसह पोलीस ठाणे गाठले व नव-याला अटक करविली. या महिलेचा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून गेली १४ वर्षे परीचयाचा असलेल्या व्यक्तिशी तिने दुसरे लग्न केले. ज्या माणसाने मुलीला लहानपणापासून बघितलं आहे तो असं उद्योग करणार नाही असे वाटल्याने तिने मुलीवर विश्वास ठेवला नव्हता परंतु व्हिडीयो टेप बघून तिचे डोळे उघडले.
आठ दिवसांपूर्वी कोळसेवाडी पोलीसांनी सदर आरोपीस अटक केली आहे. त्याचा कल्याणमध्येच प्लास्टिकचा कारखाना असून तो दुपारी घरी यायचा व जवळपास गेली दोन वर्षे मुलीला त्रास द्यायचा. मुलीची आई दुसरीकडे कामाला असल्याने हा प्रकार इतका दीर्घकाळ सुरू होता. या मुलीला माझ्या मुलीसारखीच वागवीन अशी शपथ घेऊन त्याने लग्न केल्याने घटस्फोट झालेल्या या महिलेला आधार मिळाला होता आणि त्यामुळेच त्याच्या चांगुलपणावर आपला विश्वास बसल्याचे मुलीच्या आईने सांगितले. या सावत्र बापाने अत्यंत घाणेरडा अपराध केला असून त्याला जामिन मिळू नये असा आपला प्रयत्न असेल असे या मुलीच्या वकिलांनी सांगितले आहे. पोलीसांनी देखील जामिन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आणि मुलीचे धाडस कौतुकास्पद असल्याचे सांगितले.