दत्ता यादवसातारा : जाती - पातीच्या भिंती मोडून आंतरजातीय विवाहासाठी शासन प्रयत्न करत असलं तरी समाजानं आजही अशा विवाहाला दुय्यमस्थानी ठेवलंय. हे सिद्ध करणारी घटना साताऱ्यात नुकतीच समोर आलीय.
मुलीनं आंतरजातीय विवाह करून तब्बल १९ वर्षे उलटली. तरी वडिलांच्या मनातील राग किंचितही कमी झाला नाही. याच रागातून निवृत्त अधिकारी असलेल्या सासऱ्याने चक्क जावयाच्या कानाला पिस्तूल लावले. मात्र, प्रसंगावधान राखून जावयाने त्यांचा हात पकडल्याने अनर्थ टळला. अन्यथा क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. साताऱ्याचे उपनगर असलेल्या संगममाहुलीजवळील राजनगरमध्ये ही खळबळजनक घटना घडलीय.
धन्यकुमार माने यांनी तब्बल १९ वर्षांपूर्वी आंतरजातीय लग्न केलंय. त्यांना १८ वर्षांची एक मुलगी व एक मुलगा आहे. एकंदरीत गुण्यागोविदाने त्यांचा संसार सुरू आहे. कृष्णानगर येथे माने यांचे सासरे रमेश ससाणे (वय ६६) हे वास्तव्यास आहेत. ससाणे हे उत्पादन शुल्कमधील निवृत्त अधिकारी आहेत. आजोळ जवळच असल्याने माने यांची दोन्ही मुले रविवार, दि. २९ रोजी ससाणे यांच्या घरी गेली होती. या मुलांना रात्री घरी येण्यास उशिर झाल्याने धन्यकुमार माने हे त्यांना आणण्यासाठी गेले. मुलांचे आवरेपर्यंत माने हे हाॅलमध्ये थांबले होते. त्यावेळी रमेश ससाणे म्हणाले, तु माझ्या मुलीसोबत इंटरकास्ट लव्हमॅरेज केलेस. तुमच्यामुळे आमची अब्रू गेली आहे. त्यावर माने हे त्यांना समजावून सांगत होते.
शाब्दिक वाद वाढू लागल्यानंतर माने यांनी पत्नीला फोन करून बोलावून घेतले. त्यांची पत्नीही तेथे तत्काळ आली. त्यांची मुलगी त्यांना म्हणाली, आमच्या लग्नाला आता १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीदेखील तुम्ही वाद का घालताय. असं म्हणताच रमेश ससाणे हे आतील खोलीत गेले. आतून पिस्तूल घेऊन बाहेर आले. आज तुम्हाला संपवतोच, दाखवतो मी काय आहे ते. असं म्हणून धन्यकुमार माने यांच्या कानाच्या मागे पिस्तूल लावले. परंतु प्रसंगावधान राखून माने यांनी ससाणेंचा हात धरला. त्यामुळे अनर्थ टळला. अन्यथा मोठा अनुचित प्रकार घडला असता.
आजोबाच्या ‘कर्तृत्त्वा’चे नातीने केले शूटिंग...
आजोबा रमेश ससाणे यांनी हातातील पिस्तूल वडिलांवर रोखल्याचे दिसताच नातीने हातचलाखी करून व्हिडिओ शुटिंग सुरू केलं. २१ सेकंदाचे शूटिंग झाल्यानंतर ससाणेंच्या हा प्रकार लक्षात आला. व्हिडिओ शूटिंग करू नको, असं त्यानं नातीला धमकावलं. तरीही नात ऐकत नसल्याचे पाहून त्याने हातातील पिस्तूल चक्क नातीच्या अंगावर फेकून मारलं. पण, नातीने केलेल्या २१ सेकंदाच्या शूटिंगमध्ये आजोबाचं खरं कर्तृत्त्व मात्र समोर आलं.