परभणी : व्याजाच्या नावाखाली वडिलोपार्जित जमीन हडप केल्याप्रकरणी संबंधित सावकारावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी परभणी तालुक्याच्या पोरवड येथील एका शेतकऱ्याने शुक्रवारी दुपारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयता विषप्राशन केले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राजेभाऊ माणिकराव गिराम या शेतकऱ्याने १४ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पोरवड व दामपुरी येथील सावकारांविषयी तक्रारअर्ज दिला होता़ या सावकारांनी आपल्या वडिलांच्या दारूच्या व्यसनाचा फायदा घेऊन व्याजाच्या पैशांत वडिलोपार्जित ५ एकर ४ गुंठे जमीन हडप केली. त्यामुळे आपले कुटुंब भूमीहीन झाले असून, या प्रकरणी संबंधित सावकारावर कारवाई करून जमिनीचा ताबा देण्यात यावा, असे गिराम यांनी तक्रार अर्जात म्हटले होते़ जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्यासमक्ष यावर सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी ६ मे रोजी ठेवण्यात आली आहे.शुक्रवारी गिराम यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला़ त्यामध्ये चौकशी अधिकारी संबंधित सावकारासोबत संगनमत करून जाणीवपूर्वक भेदभाव करून मानसिक त्रास देत आहेत़ त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा त्यांच्या मानसिक त्रासास कंटाळून आत्मदहन करीत आहे, असे नमूद केले होते़ नंतर दुपारी ३़३० च्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन गिराम यांनी विषप्राशन केले़ तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ (प्रतिनिधी)
सावकारावरील कारवाईसाठी शेतकऱ्याने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 02:19 IST