मुंबई : रेल्वेने प्रवासी आणि मालवाहतुकीत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. ही भाडेवाढ २५ जूनपासून लागू केली जाणार आहे. मात्र नवीन भाडेवाढ लागू करण्याआधी मध्य रेल्वेने पासातील फरक वसूल करण्यास सुरुवात करून एकच गोंधळ रविवारी उडवून दिला. भाडेवाढ २५ जूनपासून लागू असतानाही त्यापूर्वीच पास काढायला येणाऱ्या प्रवाशांकडून फरक वसूल करण्यात येत असल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर फरक वसूल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने त्वरित मागे घेण्याचा निर्णयही घेतला. २५ जूनपासून रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के तर मालवाहतुकीच्या भाड्यात ६.५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेच्या मासिक पासात १०० टक्के आणि उपनगरी तिकिटांच्या दरात १० टक्के वाढ होणार आहे. या भाडेवाढीमुळे रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेतून मिळणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील ७५ लाख प्रवाशांमध्ये जवळपास ५५ लाख प्रवासी हे पासधारक आहे आणि पासांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने यातूनच उत्पन्न जास्त येणार असल्याचे रेल्वेतील अधिकारी सांगतात. याचाच फायदा घेत मध्य रेल्वेने एक अजब निर्णय घेतला. शनिवारी मध्य रेल्वेने आपल्या स्थानकांवरील तिकीट सेवांच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांची एक बैठक घेतली आणि या बैठकीत २२ जूनपासून लोकलच्या पासातील फरक वसूल करण्याच्या सूचना केल्या. मात्र असे केल्यास प्रवाशांमध्ये संताप निर्माण होईल, असे काही पर्यवेक्षकांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे तिकीट आरक्षण करताना होणाऱ्या भाडेवाढीमुळे अशा प्रकारचा फरक घेण्यात येतो. ही बाब चालू शकते. मात्र लोकलच्या पासांचा फरक आतापासूनच कसा वसूल करणार, असे मत अनेक पर्यवेक्षकांनी मांडले. परंतु वरूनच हे आदेश असल्याचे सांगत २२ जूनपासून फरक वसुलीची अंमलबजावणी करण्यास या पर्यवेक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे २५ जूनपूर्वीच पास काढायला येणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांकडून जुना दर आणि त्याचबरोबर २५ जूनपासूनचा नवीन दर यातील फरक वसूल केला जात होता. जुन्या दराच्या नियमित अशा पासासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने प्रवाशांना तिकीट खिडक्यांमधून ‘जादा पैशा’ची एक पावतीही दिली जात होती. हा सगळा गोंधळ सर्व स्थानकांवर सुरू झाल्याने आणि भाडेवाढीआधीच भाडेवाढ वसूल केली जात असल्याने बहुतेक स्थानकांवर प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तर काहींनी मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांची भेट घेत आपला संताप व्यक्त केला. याचा बराच गाजावाजा झाल्याने रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मध्य रेल्वेला आपला ‘फरक वसुली’चा अजब निर्णय मागे घेण्यास भाग पडल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आम्ही फरक वसूल करण्याच्या कुठल्याही सूचना दिल्या नव्हत्या. आमच्या स्थानकांवर २५ जूनपासूनच नवीन दर लागू करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गजानन महतपूरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
भाडेवाढीआधीच ‘भाडेवाढ’
By admin | Updated: June 23, 2014 03:47 IST