शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध लेखक, स‌मीक्षक वि. स. खांडेकर स्मृतिदिन

By admin | Updated: September 2, 2016 12:27 IST

प्रसिद्ध लेखक, स‌मीक्षक वि. स. खांडेकर यांचा आज (२ सप्टेंबर) स्मृतिदिन

- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २ -  प्रसिद्ध लेखक, स‌मीक्षक वि. स. खांडेकर यांचा आज (२ सप्टेंबर) स्मृतिदिन. ११ जानेवारी १८९८ साली सांगली येथे त्यांचा  जन्म झाला.  शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्ट्‌सपर्यंत झाले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या चुलत चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतले. १९२० मध्ये शिरोड्याच्या ट्यूटोरिअल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक. १९३८ मध्ये ह्या शाळेतून निवृत्त. त्यानंतर वास्तव्य कोल्हापूर येथे. लेखन हाच व्यवसाय.
 
खांडेकरांचे लेखन १९१९ पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी 'कुमार' ह्या टोपण नावाने कविता व 'आदर्श' ह्या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले. वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेले रमणीरत्नहे त्यांचे नाटक अप्रकाशित आहे. 'घर कुणाचे' ही त्यांची पहिली लघुकथा १९२३ मध्ये महाराष्ट्र साहित्य ह्या मासिकात प्रसिद्ध झाली. नवमल्लिका (१९२९) हा त्यांचा पहिला कथासंग्रह.हृदयाची हाक (१९३०) ही त्यांची पहिली कादंबरी.वायुलहरी (१९३६) हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह.
 
खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक; ह्यांशिवाय काही चरित्रात्मक / समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह ह्यांचा स‌मावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत.
 
त्यांच्या वाङ्‌मयसंपदेतील काही विशेष उल्लेखनीय साहित्यकृती पुढीलप्रमाणे आहेत :
 
कथासंग्रह : नवमल्लिका, पाकळ्या (१९३९), स‌माधीवरली फुले (१९३९), नवा प्रात:काल (१९३९).
 
कादंबऱ्या : हृदयाची हाक; कांचनमृग (१९३१), उल्का(१९३४), दोन मने (१९३८), क्रौंचवध (१९४२), अश्रु (१९५४), ययाति (१९५९) आणि अमृतवेल (१९६७).
 
रूपककथासंग्रह : कलिका (१९४३), सुवर्ण कण (१९४४; अनुवादित), वनदेवता (१९६०).
 
लघुनिबंधसंग्रह : वायुलहरी, अविनाश (१९४१), तिसरा प्रहर(१९४८), मंझधार (१९५९), झिमझिम (१९६१).
 
चरित्रात्मक / स‌मीक्षात्मक : गडकरी : व्यक्ति आणि वाङ्‌मय(१९३२), आगरकर चरित्र : व्यक्ति व कार्य (१९३२), वामन मल्हार जोशी : व्यक्ति आणि विचार (१९४८), केशवसुत : काव्य आणि कला (१९५९).
 
टीकालेख व संकीर्ण लेखसंग्रह : मराठीचा नाट्यसंसार(१९४५), गोफ आणि गोफण (१९४६), रंग आणि गंध(१९६१), ते दिवस, ती माणसे (१९६१), रेषा आणि रंग(१९६१).
 
त्यांच्या पटकथा असलेले खालील चित्रपट विशेष प्रसिद्ध आहेत :
छाया (१९३६), ज्वाला (१९३७), देवता (१९३८), सुखाचा शोध (१९३९).
 
धर्मपत्नी हा तेलुगू चित्रपट व बडी माँ, दानापानी ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांच्याच पटकथांवर आधारलेले होते.
 
त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषांत - विशेषत: गुजराती, तमिळ, हिंदी ह्या भाषांत - अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या काही कथांची भाषांतरे इंग्रजी, रशियन व चेक ह्या भाषांतून झालेली आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. अनेकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत.
 
जीवन व कला ह्यांना वाहिलेल्या ज्योत्स्ना ह्या मासिकाचे ते संपादक होते.
 
१९६१ मध्ये त्यांच्या ययाति ह्या कादंबरीस महाराष्ट्र स‌रकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक दिले. ह्या कादंबरीस ह्याच वर्षी साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. ह्या कादंबरीत आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावरील भेदक भाष्य आढळते. १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९५७ साली मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांस मिळाले. १९६८ मध्ये भारत सरकारने त्यांस 'पद्मभूषण' हा किताब दिला. १९७० मध्ये त्यांस साहित्य अकादेमीचे फेलो नेमण्यात आले.
 
पूर्ववयात खांडेकरांवर आगरकर, केशवसुत, हरिभाऊ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी इत्यादींच्या साहित्याचे उत्कट संस्कार झाले आणि त्यामुळे मूलत:च स‌माजप्रवण असलेले त्यांचे मन अधिक स‌माजसन्मुख झाले. अश्रद्ध झालेल्या मानवी मनाला जीवनविषयक नवी श्रद्धा प्राप्त करून देणे, ही त्यांनी आपली जीवनश्रद्धा मानली आहे. तथापि या श्रद्धेचा वाङ्‌मयीन आविष्कार त्यांनी स्वच्छंदतावादी (रोमँटिक) प्रवृत्तीने केला. त्यामुळेच सामाजिक किंवा व्यक्तिजीवनविषयक प्रश्नांच्या तीव्र जाणिवेतून निर्माण झालेल्या त्यांच्या लेखनात स्वच्छंदतावादी ध्येयवाद आणि भावनापूर्णता आढळते. जीवनासाठी कला या भूमिकेतून जीवनातील सुखदु:खांचा बोध करून देतानाही प्रखर वास्तवाला त्यांनी भावनात्मक आणि कल्पनावादी मुरड घालून त्यांतून सामाजिक उद्‌बोधन साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या साहित्यातील जीवनदर्शनाच्या भेदकतेस मर्यादा पडतात.
 
तेजस्वी कल्पनाशक्ती आणि तल्लख विचारशक्ती या गुणांना शब्दप्रभुत्वाची जोड मिळाल्याने खांडेकरांची भाषाशैली आलंकारिक आणि सुभाषितात्मक ठरली. मराठी कादंबरीला तंत्रमंत्रदृष्ट्या प्रगल्भ व प्रभावी करण्याचे श्रेय ⇨ ना. सी. फडक्यांबरोबर खांडेकरांनाही दिले जाते. मराठी कथेला तर त्यांनी नानाविध प्रयोगांनी स‌मृद्ध व संपन्न केले.
 
स‌मीक्षक म्हणून जीवनासाठी साहित्य या भूमिकेद्वारा त्यांनी साहित्याच्या उच्च ध्येयवादाचा पुरस्कार केला. मराठी साहित्यक्षेत्राविषयी सातत्याने जागरूक राहून त्यांनी साहित्यविषयक अनेक प्रश्नांची व प्रमेयांची उद्‌बोधक चर्चा केली. कुसुमाग्रज, बोरकर, बाबा आमटे यांच्या काव्यगुणांचा प्रभावी परिचय त्यांनीच पहिल्यांदा आपल्या प्रस्तावनांतून महाराष्ट्राला करून दिला. खांडेकरांना ययाति कादंबरीबद्दल १९७४ - ७५ चे भारतीय ज्ञानपीठाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले एक श्रेष्ठ स‌मर्पित साहित्यिक म्हणून त्यांचे मराठीतील स्थान कायम राहील. 
२ सप्टेंबर १९६ साली त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य : मराठी विश्वकोश