कॅबिनेट मंत्री : पांडुरंग फुंडकर, महादेव जानकर, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावलराज्यमंत्री : मदन येरावार, रवींद्र चव्हाण, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील व इतर ज्येष्ठ मंत्र्यांनी केलेल्या जागरणानंतरही खातेवाटपावर एकमत होऊ शकले नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांवर निर्णय सोपविण्यात आला असून, ते शनिवारी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी खातेवाटप जाहीर करतील. मंत्रिमंडळ विस्ताराने भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांत ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन आपले आसन अधिक मजबूत केले. आता कोणाकडे कोणते खाते जाणार, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कृषी, सहकार, उत्पादन शुल्क आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांकडे सर्वांचेच लक्ष आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले महसूल खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे, तर कृषी खाते पांडुरंग फुंडकर यांच्याकडे व सहकार खाते सुभाष देशमुख जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता विधान भवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी एकूण ११ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सध्या गृह राज्यमंत्री पदावर असलेले राम शिंदे यांना बढती मिळाली. त्यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागली. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्यासह सोलापूरचे सुभाष देशमुख, निलंग्याचे संभाजी पाटील-निलंगेकर, सिंदखेडाचे जयकुमार रावल व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन मुख्यमंत्र्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागले. (विशेष प्रतिनिधी)शिवसेनेला आधीची चूक भोवलीआणखी एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेनेने खूप प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. याआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खा. अनिल देसाई यांचे नाव घेतलेले असताना देसार्इंना दिल्ली विमानतळावरून परत बोलावून घेतले गेले. त्याची नाराजी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या मनात अजूनही आहे. त्यामुळे परवा झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन करून मंत्रिमंडळात समावेश होण्याची इच्छा व्यक्त केली तरच ते म्हणतील त्या खासदारास मंत्री केले जाईल, असे सांगण्यात आले होते. पण ठाकरेंनी फोन केला नाही. परिणामी, विस्तारात शिवसेनेचा समावेश झाला नाही. राज्यात ठरल्याप्रमाणे सेनेला दोन राज्यमंत्रिपदे देऊ; शिवाय गृहराज्यमंत्रिपद देतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘उगाच ताणू नका, आहे तेही होणार नाही’ असा सल्ला दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यावर शेवटी शिवसेना दोन राज्यमंत्रिपदे स्वीकारून मंत्रिमंडळात सहभागी झाली. उद्या खातेवाटप, तोपर्यंत पतंग उडवा!शपथविधी आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेकडे निघाले असता ‘खातेवाटप कधी होणार,’ या पत्रकारांच्या प्रश्नावर तुम्ही आधी पतंग उडवा, मी उद्या खातेवाटप जाहीर करतो, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. उद्यापासून मुख्यमंत्री रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. जाण्यापूर्वी ते खातेवाटपाची यादी जाहीर करतील. त्यामुळे खातेवाटपावरून नाराजीची वेळ येईल, तेव्हा मुख्यमंत्र्यांचे विमान झेपावलेले असेल. विद्यमान मंत्र्यांकडील काही खाती काढली जाण्याची शक्यता आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मंत्रिपद कायम राहिले तरी जलसंधारण खाते काढून घेतले जाणार आहे.तावडे कट टू साईज!मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. तावडे यांना विधान परिषदेत सभागृह नेता केले जाईल असे सांगितले जात होते. मात्र आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची सभागृह नेतेपदी निवड करून तावडे यांना धक्का दिला. शिवाय, तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य ही दोन मंत्रिपदेही काढून दुसऱ्या मंत्र्यांना दिली जातील, असे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची राजकीय पकड मजबूत करत तावडेंना कट टू साईज केल्याची चर्चा विधिमंडळात होती.वेगळा अर्थ काढू नका मी शपथविधीला गेलो नाही याचा वेगळा अर्थ काढू नका. मंत्रिमंडळाचा विस्तार ठरल्याप्रमाणेच झाला आहे. शिवसेनेची बोळवण वगैरे झालेली नाही. तसे असते तर आम्ही नक्कीच स्वाभिमान दाखवला असता. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना