कल्याण : थकबाकीदारांना दंडातून विशेष सवलत देण्याच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरू केलेल्या ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून जानेवारी अखेरपर्यंत ७२ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. दरम्यान, याला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता ही योजना आता १४ फेब्रुवारीपर्यंत चालविण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात समाविष्ट असलेल्या तरतुदीनुसार थकीत करदात्यांनी कराची रक्कम एकरकमी भरल्यास आकारलेल्या दंडात विशेष सूट देण्यात येणार आहे. त्यानुसार ५ डिसेंबर २०१४पासून अभय योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ३१ जानेवारीपर्यंत राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ संबंधित करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी केले होते. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत सुमारे ७२ कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून उत्पन्नात झालेली वाढ पाहता यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. शनिवारी झालेल्या गटनेते, पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत अभय योजनेला मुदतवाढ देण्यास आयुक्त मधुकर अर्दड यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
अभय योजनेला मुदतवाढ
By admin | Updated: February 2, 2015 04:48 IST