खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ सैल झालेले दगड काढण्याचे काम बुधवारी अचानक सुरू करण्यात आले. यामुळे गुरुवारी पुण्याकडे जाणारा मार्ग बंद ठेवून या महामार्गावरील वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत खालापूर टोलनाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून खोपोली, बोरघाटमार्गे वळविण्यात आली होती. पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवल्याने वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढल्यानंतरही जुन्या मार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू होती. काम पूर्ण झाल्यानंतर पुण्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती आयआरबीचे रस्ता सुरक्षा प्रमुख पी. के. शिंदे यांनी दिली.बोरघाटात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील प्रवास धोकादायक बनला आहे. खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळू नयेत म्हणून उपाययोजना सुरू असतानाच १४ आॅगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक महाकाय दगड वॅगनर कारवर कोसळल्याने लाखो रुपये खर्च करून केल्या जात असलेल्या उपाययोजना फोल ठरत असल्याचे समोर आले होते. आडोशी बोगद्यावरील दगड सैल झाल्याने केव्हाही कोसळण्याची भीती असल्याने हे दगड काढण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला होता. त्यानुसार बुधवार व गुरुवारी हे काम करण्यात आले.
एक्स्प्रेस-वेची वाहतूक दुरुस्तीनंतर खुली
By admin | Updated: August 22, 2015 01:20 IST