मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीची धडक बसून आज संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १० नागरिकांसह नौदलाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
एलिफंटाजवळ झालेल्या दुर्घटनेबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईजवळील समुद्रात असलेल्या बुचर बेटांजवळ आज ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. संध्याकाळी ७.३० पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामधून आतापर्यंत १०१ जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आणि ३ नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस यांना ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून बचाव कार्य करून वेगाने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत सापडलेल्यांपैकी आणखी कुणी बेपत्ता आहे का, याबाबत अद्यापही अंतिम माहिती मिळालेली नाही. सकाळपर्यंत याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.