मुंबई - कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्याऐवजी भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त वीज देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत.
महावितरणचा ८५ टक्के खर्च वीज खरेदीवर होतो. इतर घटकांवर १५ टक्के खर्च होतो. महावितरणला सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा सरासरी दोन हजार मेगावॉट वीज उपलब्ध असून, नियोजन केल्यानुसार भविष्यात यात वाढ होईल, साहजिकच विजेचे दर कमी करणे शक्य होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे. नव्या प्रस्तावानुसार १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत वीज दराच्या प्रस्तावावर सूचना, हरकती दाखल करता येतील.
वीज दर प्रस्तावासंदर्भातील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता नवी मुंबईमधील सिडको भवनमध्ये होणार आहे. तसेच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमध्येही सुनावणी होणार आहे.
औद्योगिक ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती सुरूच राहतील. दिवसा जो वीज वापरेल त्याला जवळजवळ २ रुपये ४० रुपये सवलत मिळेल. विजेचे दर दरवर्षी ८ ते १० टक्के वाढणे अपेक्षित असते. मात्र, सौरऊर्जेमुळे पुढील पाच वर्षे विजेचे दर कमी होतील. त्यानुसार दर ९ रुपये ४५ रुपयांहून ९ रुपये १४ पैसे असा कमी होईल. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे पाच वर्षांत १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठीचे दर ५ रुपये ८७ पैसे प्रतियुनिटपर्यंत, तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११.८२ प्रतियुनिटपर्यंत कमी होतील.- विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण