संदीप प्रधान, मुंबईनिवडणूक आचारसंहितेचा गजर होणार याची चाहूल लागल्याने आता मुंबईतील अनेक इच्छुक उमेदवार झोपेतून जागे झाले असून पुढील महिनाभर प्रसिद्धीकरिता पीआर करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सींची शोधाशोध करू लागले आहेत. घायकुतीला आलेल्या या इच्छुक उमेदवारांना प्रसिद्धीकरिता किमान १५ ते २० लाख रुपये मोजावे लागणार असून काही इच्छुकांना लाखोंच्या टोप्या घालणाऱ्या उपटसूंभांचा या निमित्ताने सुळसुळाट झाला असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:चे केलेले ब्रँडिंग व प्रसिद्धी तंत्राचा केलेला वापर, राज्यातील काही नेत्यांकडून त्याचेच सुरु असलेले अनुकरण या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्य काही शहरी भागातील संभाव्य उमेदवार आता पीआर पर्सन्सच्या शोधात आहेत. निवडणूक काळात आपल्या बातम्या व फोटो ठळकपणे प्रसिद्ध व्हावेत, चॅनेलवर आपली छबी झळकावी आणि आपल्यावरील आरोपांना तात्काळ प्रत्युत्तर दिले जावे ही उमेदवारांची अपेक्षा आहे. काही उमेदवारांना फेसबुक, टिष्ट्वटर अकाऊंट सुरु करायचा आहे. तंत्रज्ञानाचे अज्ञान आणि प्रसिद्धीची गरज यातून संभाव्य उमेदवारांची फसवणूक करण्याचे काही प्र्रकार घडले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा जनसंपर्क दीर्घकाळ सांभाळलेले ज्येष्ठ जनसंपर्क सल्लागार चारुहास साटम म्हणाले की, राजकीय व्यक्तींच्या पीआर पर्सनची भूमिका ही थिंक टँकची असली पाहिजे. नेत्यामधील उणिवा दूर करून त्याला राजकारणात वेगळ््या उंचीवर नेण्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे.यापूर्वी पीआर क्षेत्रात स्थिरावलेल्या मंडळींच्या मते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पीआर नेमून प्रसिद्धीची अपेक्षा करणे अयोग्य आहे. किमान वर्ष-दीड वर्षे अगोदर ज्यांनी या दिशेने प्रयत्न केले असतील त्यांना निवडणुकीत त्याचा निश्चित फायदा होईल. निवडणूक काळात केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरती मर्यादित, अशी ही भूमिका नाही. उमेदवाराने काय बोलावे व काय बोलू नये याचे मार्गदर्शन पीआरने करणे अपेक्षित आहे, असे मत दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे पीआर व माध्यम सल्लागार केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. मोदींनी आपल्या प्रचारात पोगोपासून आयपीएलपर्यंत सर्व बाबींचा कुशलतेने वापर केला. मुंबईतील उमेदवारांनाही असे काही करायचे असले तरी, आता फारसा वेळ उपलब्ध नाही. मात्र महिला व युवकांमधील लोकप्रिय मालिकांदरम्यान प्रचार करण्याकडे उमेदवारांचा कल असल्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील, रामदास आठवले यांचे पीआर सांभाळणारे मयूर बोरकर यांनी सांगितले.
निवडणूक गजराने उडविली झोप...
By admin | Updated: September 11, 2014 03:11 IST