कोल्हापूर - नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला, एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. कोल्हापूरातील मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले की, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल… गुलाल आम्हीच उधळणार आहोत. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापूर्वीप्रमाणेच याही निवडणुकांमध्ये येथे भगवा फडकणारच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसैनिक हा पक्षाचा आत्मा असल्याचे सांगत, जो काम करेल तोच पुढे जाईल. कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि दमदार तयारीवरच शिवसेना उभी आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे मदत पॅकेज, कर्जमाफीसाठी प्रक्रिया, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना, बचत गटांना वाढीव निधी, तर कोल्हापूरसाठी पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पाला ५०० कोटी, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी आणि आयटी पार्कसह मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, लोकसभेत खोटा नॅरेटिव्ह पसरवला, पण विधानसभेत आम्ही त्यांचा टांगा पलटी केला. आता नगरपालिकांमध्येही त्यांच्या गोटात फरफट होणार. महाराष्ट्राच्या जनतेने मोगलाई चालणार नाही हे दाखवून दिलं आहे. कोल्हापुरात कुस्तीची ताकद आहे, विरोधकांना थेट धोबीपछाड द्या. गाव तिथे शिवशाही, घर तिथे शिवशक्ती. मतदार यादी तपासा, आपला मतदार राहिला पाहिजे. बूथप्रमुख हा विजयाचा शिल्पकार आहे. निवडणुकीतच नाही तर संकटातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहा. सत्ता येते-जाते पण नाव आणि मान गेले तर परत येत नाही असं आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
दिवाळीपेक्षाही मोठे फटाके फुटणार
शिवसेना हा पक्ष नसून कुटुंब आहे. आम्ही माणसांना प्रेम देतो. रोज शेकडो प्रवेश होत आहेत. १०२ संघटना पक्ष प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. शिवसेनेवर विश्वास वाढत चाललाय. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ३ तारखेला दिवाळीपेक्षाही मोठ्या फटाक्यांची रोषणाई महाराष्ट्रात होणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
Web Summary : Eknath Shinde declared war on opponents, promising victory in local elections. He announced development projects for Kolhapur and criticized previous governments. Shinde emphasized Shiv Sena's strength and predicted a massive celebration on December 3rd.
Web Summary : एकनाथ शिंदे ने स्थानीय चुनावों में जीत का वादा करते हुए विपक्ष पर हमला बोला। उन्होंने कोल्हापुर के लिए विकास परियोजनाओं की घोषणा की और पिछली सरकारों की आलोचना की। शिंदे ने शिवसेना की ताकत पर जोर दिया और 3 दिसंबर को बड़ी जीत की भविष्यवाणी की।