ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30- राज्याचे महसूलमंत्री आणि कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे सतत वादाच्या भोव-यात सापडले आहेत. दाऊद फोन कॉल, गजानन पाटील लाच प्रकरण आणि भोसरी एमआयडीसीची जमिनीच्या प्रकरणांचा ससेमिरा एकनाथ खडसेंच्या मागे लागला आहे. विरोधकांनीही एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणांमुळे भाजपा अध्यक्ष अमित शाहाही खडसेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी एकनाथ खडसेंना समर्थन दिलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसेंच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. एकनाथ खडसेंवर असलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांमुळे कॅबिनेट विस्तार लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.