ठाणे : हटकल्यामुळे संतापलेल्या एका मद्यपीने पोलीस शिपायास मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री कळवा परिसरात घडली.कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मनोहर लोखंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत गुरुवारी रात्रीची गस्त घालत होते. मध्यरात्री २ च्या सुमारास ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खारेगावकडून कळव्याकडे येत होते. त्या वेळी कळव्यातील सह्याद्री सोसायटीजवळ खारेगाव येथील रहिवासी संतोष देसाई मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला घरी जाण्यास सांगितल्याचा राग येऊन त्याने लोखंडे यांच्या कानशिला लगावली, तसेच धक्काबुक्की करून अवजड वस्तूने डोक्याला दुखापत केली. सहकारी पोलीस शिपायाने अडवण्याचा प्रयत्न केला असता देसाईने त्यांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी त्याला अटक केली असून, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलीस शिपायास मारहाण
By admin | Updated: April 29, 2017 02:48 IST