ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. १५ - स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या व श्रावण महिन्यामुळे भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमुळे चाकण येथील पुणे-नासिक महामार्गावर चक्का जाम झाल्याने सलग दोन दिवस वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले.
पुणे-नासिक महामार्ग, शिक्रापूर रोड व तळेगाव रोड वर २-२ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने रस्ते चक्का जाम झाले होते. या गर्दीचा रुग्णवाहिकांना मोठा फटका बसला असून चाकणच्या दोन्ही चौकात उड्डाण पूल उभारून तळेगाव दाभाडे -चाकण-शिक्रापूर हा राज्य महामार्ग रस्ता त्वरित चौपदरी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जड वाहनांना दिवसा बंदी असतानाही काल व आज दोन दिवस अवजड वाहने रस्त्यावरून जात असल्याने सर्व रस्ते जाम झाले होते. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामगार वर्गही मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला व गावाकडे जाण्यासाठी घराबाहेर पडल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या मोठी होती.
महामार्ग सोडून एस टी महामंडळाच्या बसेस सर्व्हिस रस्त्यावर आल्याने शहराची अंतर्गत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत मंचर हून पुण्याकडे रुग्णालयात रुग्णाला घेवून जाणारी रुग्णवाहिका अडकून पडली होती. चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी पर्यंत, शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी पर्यंत, पुणे रस्त्यावर गवते वस्ती पर्यंत; तर नासिक रस्त्यावर आंबेठाण चौका पर्यंत २-२ किलोमीटर वर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची भर पडली होती. वाहतूक सुरळीत करताना पोलिस प्रशासनही अगदी मेटाकुटीस आले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वेळ सिग्नल यंत्रणाही बंद करण्यात आली होती. तरीही नागरिक तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. काही केल्या वाहने पुढे सरकत नसल्याने प्रवासी १ किलोमीटर अलीकडेच उतरून पायी जात असतानाचे चित्र दिसत होते.