मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या पाथरी वनक्षेत्रातील चार बछड्यांंचा मृत्यू हा वाघिणीने बछड्यांना दूध न पाजल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशी अहवालातून समोर आले असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना दिली. तसेच त्या वाघिणीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाला कळविल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष तपास पथकामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचा एक अधिकारी, वन विभागाचा एक अधिकारी आणि पोलीस दलाचा एक अधिकारी यांचा समावेश असेल. या वाघिणीची शिकार झाली का, पाणी पिण्यासाठी गेली असतांना ती कुठल्या विहिरीत पडली का, या बाबींचा शोध सुरु आहे. ही घटना चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाबाहेरची घटना आहे. राज्यातील वाघांची संख्या वाढावी यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करत आहे. व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. पण बफर क्षेत्राबाहेर घडलेली ही घटना लक्षात घेऊन बफरक्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व असलेल्या प्रदेशातही विशेष व्याघ्र संरक्षण दल नियुक्त करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. वाघांच्या शिकारीस प्रतिबंध करणारा केंद्रीय कायदा अधिक कडक करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस पाठवली आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)काँग्रेसचा आरोपचंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या ४ पिल्लांच्या मृत्यूसाठी वन खात्याची निष्क्रि यता कारणीभूत असल्याची टीका टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मृत पिल्लांची माता अजूनही बेपत्ता आहे. सदरहू परिसरात दोन वाघिण आणि एक वाघ असल्याची माहिती वनखात्याला होती. परंतु, योग्य पद्धतीने देखरेख न झाल्याने त्या दोन वाघिणींपैकी एक गरोदर आहे, हे वन खात्याला कळालेच नाही. तिला चार पिल्ले झाली तरी वन खात्याला कळाले नाही. ही निष्क्रि यतेची परीसीमा असून, आता पिल्ले मरण पावल्यानंतर आणि वाघिण बेपत्ता झाल्यानंतर सरकारला जाग आल्याचे सावंत म्हणाले.
दूध न पाजल्यानेच बछड्यांचा मृत्यू
By admin | Updated: December 30, 2015 00:38 IST