औरंगाबाद : दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी औरंगाबादेत शुक्रवारी माणुसकी धावून आली. अवघ्या तासाभरात ३०० दानशूर लोकांनी तब्बल १३ लाख ७० हजार ५६९ रुपयांचा निधी दिला. नाम फाउंडेशनकडे आतापर्यंत ७ कोटी रुपये जमा झाले आहेत. अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेक लोक पुढे आले आहे. येथील दुपारी तापडिया नाट्यमंदिरात दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. शालेय विद्यार्थिनींनी वाढदिवस साजरा न करता ते पैसे नाना पाटेकर यांच्या हातात दिले. सेवानिवृत्त शिक्षकाने पेन्शनमधून रक्कम दिली. हातगाडीवाल्यानेही तुटपुंज्या कमाईतून पैसे दिले.काही अपंग व्यक्तींनीही मदतकेली. जातीपातीच्या सर्व भिंती ओलांडून सर्व जण माणुसकीच्या नात्याने आले होते.काही गणेश मंडळांनीही शिल्लक वर्गणीचा धनादेश मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपुर्द केला. नाना पाटेकर म्हणाले की, ‘ही रक्कम आमची नाही, ही जनतेची आहे. नाम फाउंडेशनचा व्यवहार पारदर्शक असून, प्रत्येक पैशाचा हिशोब दिला जाणार आहे. फाउंडेशनचे काम निरंतर सुरू राहणार आहे, अशी ग्वाही अनासपुरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांना मदत करून घडवले माणुसकीचे दर्शन
By admin | Updated: October 3, 2015 03:27 IST