- मोहन राऊतधामणगाव रेल्वे (अमरावती) : विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ बसली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे आठ लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. जलस्रोत शोधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ नागपूर-मुंबई कृषिसमृद्धी महामार्गाच्या कामाला जमीन हस्तांतरणानंतर गती आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतून जाणाºया ७३ किलोमीटरच्या रस्त्याचे काम वेगाने होत आहे. त्यानंतर काँक्रीट पिलर उभारणीला सुरुवात होईल. त्यासाठी खूप पाण्याची आवश्यकता आहे.३ वर्षांपासून तिन्ही तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीत सातत्याने घटत आहे. यंदा धामणगाव रेल्वे तालुक्यात पाऊसच नाही. कृषी समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागातील १३ गावे पाणीटंचाईने होरपळत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले नाही. कृषिसमृद्धी महामार्गाला पाणी द्यायचे तरी कोठून, असा सवाल महसूल विभागाला पडला आहे.लोअर वर्धा, बेंबळा वर भिस्त ७३ किलोमीटर रस्त्याच्या बांधकासाठी यावर्षी दीड लाख घनमीटर, पुढील तीन वर्षांत आठ लाख घन मीटर पाण्याची आवश्यकता आहे. वर्धा जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे पाणी यासाठी वापरता येणार आहे. एनसीसी कंपनीने आपली मागणी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. यंदा मुरूम वापरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खदानीत पुढील वर्षी पाणी साठवून ते महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यासंबंधी उपायोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने कंपनीला दिले आहेत.तीन तालुक्यांतील ७३ किमी कृषिसमृद्धी महामार्गासाठी यंदा दीड लाख घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासन उपाययोजना राबवित आहे. पाण्यामुळे या प्रकल्पाचे काम थांबणार नाही.- अभिजित नाईक, एसडीओ, चांदूर रेल्वे
‘समृद्धी’च्या कामाला दुष्काळाची झळ; आठ लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 01:07 IST