पिंपरी : बांधकाम सुरू असताना कधी स्लॅब कोसळून, तर कधी इमारतीचा पाया खचून शहरात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या घटनांमधून बांधकामाच्या दर्जाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला आहे. लाखो रुपये खर्चून घेतलेल्या सदनिकेत ज्या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यासाठी जायचे, त्या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे असेल का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. बांधकाम अधिकृत की अनधिकृत असेल, असा प्रश्न आतापर्यंत नागरिकांना पडत होता. आता बांधकामाच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. दोन वर्षांपूर्वी आॅगस्टमध्ये चिखली, पूर्णानगर येथे चार मजल्यांची इमारत जागेवरच खचली. दगडांच्या खाणीजवळ उभारलेल्या या गृहप्रकल्पाच्या इमारतीचा पाया खचून सुमारे २० फुटांचा खोल खड्डा पडला. पिंपळे गुरव, रहाटणी, हिंजवडी भागातही बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष जाऊ नये, यासाठी घाईगडबडीत केलेल्या बांंधकामाच्या ठिकाणी अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. वैयक्तिक मालकीच्या घरांची ही वाढीव बांधकामे असल्याने त्याचा बोलबाला होत नाही. अनधिकृत बांधकामे नियमित होणार असल्याने अर्धवट कामे उरकण्याचे प्रयत्न काही नागरिक करत आहेत. मात्र, व्यावसायिक हेतूने बांधण्यात येणाऱ्या इमारतींच्या दुर्घटना दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. चार हजार रुपयांपासून ते साडेसात हजार रुपये प्रति चौरस फूट दराने विक्री केल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पातही निकृष्ट दर्जाचे आणि नियमबाह्य काम होत असल्याची बाब बालेवाडीतील स्लॅब कोसळण्याच्या घटनेने निदर्शनास आली आहे. १२ मजल्यापर्यंतच्या इमारतीची मंजुरी असताना वाढीव दोन मजल्यांचे काम बेकायदेशीररीत्या केले जात असल्याचे स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे उघडकीस आले. पिंपरी-चिंचवडमध्ये साकारलेल्या अनेक गृहप्रकल्पांमध्ये ही स्थिती आढळून येते. चार ते पाच वर्षांपूर्वी ज्यांनी सदनिका खरेदी केली, पैशांची अत्यावश्यकता म्हणून सदनिका विक्रीस काढली, त्यांना ग्राहकाला सदनिकेचे कागदपत्र दाखवताना हा प्रकार लक्षात येतो. आपण राहत सदनिका इमारतीच्या मंजूर आराखड्यात नसल्याचे लक्षात येते. पाच मजल्यांची परवानगी असताना, सात मजल्यांच्या इमारती उभारल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. इमारतीचा वाढीव मजल्यांचा सुधारित नकाशा महापालिकेकडे मंजुरीसाठी दिला आहे, असे भासवून बिल्डर ग्राहकांची फसवणूक करतात. महापालिकेने मंजूर केलेल्या प्लॅननुसार बांधकाम करून त्यानंतर मजले वाढवले जातात. काही मजले अनधिकृत असल्याची माहिती लपवली जाते. ग्राहकांची दिशाभूल करून किंमत काहीशी कमी करून, बिल्डरचे प्रतिनिधी स्वत: पुढाकार घेऊन त्यांच्यांशी संबंधित वित्तसंस्थांकडून कर्ज उपलब्ध करून देतात. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय राष्ट्रीयीकृत बँका कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. अधिक मजले वाढविलेल्या सदनिकांना बिल्डरच कर्ज मिळवून देतात. (प्रतिनिधी)>कोणीही झालेत बिल्डर एखाद-दुसऱ्या बंगल्याचे, इमारतीचे बांधकाम करण्याचे कंत्राट मिळालेले ठेकेदार थोडा अनुभव घेतल्यानंतर लगेच पाच ते दहा गुंठ्यांत गृहप्रकल्पाचे नियोजन करतात. गावठाण भागात ज्यांच्या शेतजमिनी आहेत. ते एखाद्या नवख्या बिल्डरला हाताशी धरून जॉइंट व्हेंचरमध्ये गृहप्रकल्प उभारण्यास पुढाकार घेऊ लागले आहेत. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे एजंटसुद्धा अलीकडच्या काळात एखाद-दुसरा गृहप्रकल्प उभारून बिल्डर म्हणून वावरू लागले आहेत.ग्राहकांची दिशाभूल बांधकाम क्षेत्राचा कसलाही गंध नसलेल्या लोकांचा या क्षेत्रात शिरकाव झाला आहे. त्यामुळे बांधकामाचा दर्जा राखला जात नाही. कमी खर्चात, अल्पावधीत प्रकल्प उभारून नफा कमाविण्याचा त्यांचा उद्देश असल्याने बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्तेला महत्त्व दिले जात नाही. बांधकाम व्यवसायात स्पर्धा निर्माण झाल्याने काही नामांकित बिल्डरकडूनही दिशाभुलीचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे ग्राहक घर घेताना संभ्रमात असतात.
दुर्घटनांमुळे निकृष्ट बांधकामे चव्हाट्यावर
By admin | Updated: August 3, 2016 01:18 IST