महाड : येथील औद्योगिक वसाहतीतील रोहन या रासायनिक कारखान्यावर छापा टाकून पोलिस आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ८८ कोटी ९२ लाखांचा केटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोठी साखळी असून, पोलिस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.दोन महिन्यांपासून औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक ई २६/३ येथील रोहन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये केटामाईन या अमली पदार्थाची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाड औद्योगिक वसाहत पोलिस, महाड शहर पोलिस, पोलादपूर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. यावेळी रोहन केमिकल कंपनीमध्ये केटामाईन हा अमली पदार्थ तयार करताना आरोपींना रंगेहाथ पकडले. यावेळी ३४ किलो केटामाईन पावडर, १३ किलो लिक्विड केटामाईन असा एकूण ८८ कोटी ९२ लाख २५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थप्रकरणी कारवाई करणाऱ्या पथकात अमली पदार्थ विरोधी पथक मुंबई आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन माने, महाड शहर ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव आणि पोलादपूर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आनंद रावडे यांचा प्रमुख सहभाग होता.
महाड एमआयडीसीतून ८९ कोटींचे अमली पदार्थ जप्त; रोहन कारखान्यावर छापा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:54 IST