ऑनलाइन टीम
ठाणे, दि. ५ - ऑफीसमधून रात्री उशीरा घरी परत जात असताना रिक्षावाल्याने मार्ग बदलल्याने आपलं अपहरण होतयं या भीतीने एका तरूणीने चालत्या रिक्षातून बाहेर उडी मारली आणि त्यात जबर जखमी झाल्यामुळे ती सध्या कोमात गेल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. स्वप्नाली असे त्या दुर्दैवी तरूणीचे नाव असून शनिवारी रात्री तिला कामावरून यायाला उशीर झाला. घरी (कोलशेतच्या दिशेने) जाण्यासाठी तिने कापूरबावडी येथील नाक्यावरून रिक्षा पकडली खरी, पण रिक्षावाल्याने कोलशेतच्याऐवजी भिवंडीच्या दिशेने रिक्षा वळवल्याचे तिच्या लक्षाता आले. यामुळे घाबरलेल्या स्वप्नालीने तात्काळ चालत्या रिक्षातून बाहेर उडी मारली. यामुळे ती गंभीर जखमी झाली व तिला जबर रक्तस्त्राव सुरू झाला. सुदैवाने त्यावेळी नगरसेविका उषा भोईर त्याच मार्गावरून जात होत्या. त्यांना स्वप्नाली रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्यावर त्यांनी तिला उपचारासांठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या स्वप्नालीवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु असून जबर मार लागल्याने ती अद्याप कोमातच आहे.
दरम्यान ज्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडला तो रिक्षाचालक मात्र अद्याप फरार आहे, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.