कळंबोली : सोमवारी रात्रीपासून पनवेल परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे व सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्याचबरोबर महामार्गावरही पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती.सोमवारी रात्रीपासून मुंबईसह पनवेल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप घेतली नाही. त्यामुळे सखल भागात हळूहळू पाणी साचू लागले. गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा नदीचे पात्र भरून वाहू लागले. त्याचबरोबर परिसरातील नाले सुध्दा मंगळवारी दुथडी भरून वाहत होते. पनवेल शहरात सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, बावन बंगला, शिवाजी चौक, उरण नाका, टपाल नाका, कोळीवाडा, मिडलक्लास सोसायटी, हाऊसिंग सोसायटी या सखल भागात एक ते दीड फूट पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले.नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे सिडकोने व्यवस्थित नाले सफाई न केल्याने बांठिया हायस्कूल, अभ्युदय बँक, ए टाईप, सेक्टर ६ तसेच खांदा वसाहतीत शिवाजी चौक सेक्टर ८ येथे पाणीच पाणी दिसून आले.कळंबोली वसाहत साडेतीन मीटर खाली असल्याने सोमवारी रात्रीच सर्व ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. त्या पाण्यातून वाट काढण्यासाठी कळंबोलीकरांना मोठी कसरत करावी लागली. रोडपाली परिसरात सेक्टर १२, १३, १४, १५ येथे नालेसफाईचा मुद्दा पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरला. येथेही एक ते दीड फूट पाणी रस्त्यावर साचले होते. याबाबत रहिवाशांनी सिडकोविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कामोठे वसाहतीतही बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
पनवेल परिसरात पाणीच पाणी
By admin | Updated: July 20, 2016 03:19 IST