अ. पां. देशपांडे -आज भारतात शास्त्रज्ञ कोण म्हटल्यावर चटकन नाव पुढे येते ते डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे. त्यांनी भारत सरकारच्या विज्ञानाच्या ४० प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देऊन संशोधन प्रगतिपथावर नेले. संशोधनासाठी पेटंट कसे घ्यायचे याची चळवळ निर्माण केली. अशा रघुनाथ माशेलकरांचे पालन-पोषण त्यांच्या वडिलांच्या मागे आई अंजनीताई यांनी मोलमजुरी करून केले. त्यामुळे आपण एसेस्सी झाल्यावर नोकरीला लागून आईचा भार हलका करावा, असा विचार माशेलकरांच्या मनात आला, पण आईने त्यांना केमिकल इंजिनीअर व्हायला भाग पाडले. आता पुढे काय म्हणून पीएचडी करायला प्रवृत्त केले. मग परदेशी जाऊन आणखी शिक्षण घ्यायला लावले. एक मोलमजुरी करणारी आई काय करू शकते पाहा ! यानंतर माशेलकरांना गुरू भेटले. ते म्हणजे प्रा. एम.एम. शर्मा. त्यांच्या हाताखाली त्यांनी पीएच.डी केली. त्यासाठी त्यांनी अगदी तुटपुंज्या साधनात प्रयोग केले व त्यावरून कल्पकता असेल तर कमी साधनातही उद्दिष्ट गाठता येते हे ते शिकले व ते भारतात उपयोगी पडले.
डॉ. रघुनाथ माशेलकर
By admin | Updated: June 23, 2015 01:59 IST