मुंबई : मध्य रेल्वेवरील दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागोठणे ते रोहा पट्ट्यातील अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी असून ते २0१६ च्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्यामुळे मेल-एक्सप्रेसच्या वेळेत बचत होणार आहे. कोकण रेल्वेकडून रोहा ते ठोकुरपर्यंतचे दुहेरीकरण केले जाणार आहे. दुहेरीकरण केल्यामुळे मेल-एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग सुकर होईल. सध्या एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादा अपघात झाल्यास संपूर्ण सेवा कोलमडते. त्यामुळे या मार्गांवर ११ हजार कोटी रुपये खर्च करुन दुहेरीकरण करण्याचा नियोजन आहे. मात्र त्याआधी मध्य रेल्वेकडून त्यांच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम मार्गी लावले जात आहे. पनवेल ते रोहा असे दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला आहे. यात पनवेल ते पेणसाठी २७0 कोटी रुपये तर पेण ते रोहासाठी ३७0 कोटींची तरतुद रेल्वेकडून करण्यात आली. यातील पनवेल ते पेणपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले. तर आता पेण ते रोहा टप्प्यातील नागोठणे ते रोहा या अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. हे काम डिसेंबर २0१६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. सध्या रोहापासून थोडे अंतर आधी असणाऱ्या एका जागेवरुन वाद सुरु असून ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर तोडगा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यावर मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत साधारपणे पंधरा मिनिटांची बचत होईल. त्याचप्रमाणे भविष्यात दिघी पोर्टवर भार वाढणार असून तेव्हा या दुहेरी मार्गाचा खूप फायदा रेल्वेला होणार असल्याचेही पाटील म्हणाले. सध्या एक्सप्रेस ट्रेनला दिवा ते रोहापर्यंत जाण्यासाठी साधारपणे दोन तासांचा अवधी तर पॅसेंजर गाड्यांना किमान तीन तास लागतात. त्यांच्या वेळेत यामुळे बचत होणार आहे.दुहेरीकरणामुळे मालवाहतुक करणे अधिक सोयीचे होणार आहे. दिघी बंदरावरील भार कमी होतानाच न्हावा शेवा बंदराकडेही मालाची ने-आण करताना लागणारा वेळ कमी होईल, असा दावा रेल्वे अधिकारी करत आहेत.
दुहेरीकरणाचे काम २0१६च्या अखेरीस
By admin | Updated: June 9, 2016 06:13 IST